Crime

पोलीस कर्मचाऱ्याकडून धर्मांतर व द्विविवाह : एकता संघटनेचा आरोप आणि निवेदन

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५१/२०२५ नोंदविण्यात आला असून, संशयीत आरोपी पोलीस कर्मचारी नितीन कमलाकर सपकाळे याने कोलकाता येथील एका मुस्लिम युवतीला लग्नाचे प्रलोभन दाखवून पीडितेच्या इच्छेविरुद्ध जळगावच्या वेगवेगळ्या हॉटेलमध्ये अत्याचार केला. स्वतःची पत्नी जिवंत असतानाही दुसरे लग्न मंदिरात करून फसवणूक केल्याचे त्यात म्हटले आहे. दरम्यान, तरुणीला जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा आरोप एकता संघटनेने केला आहे.

एकता संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, पीडितेला तब्बल सहा महिने जळगाव पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यासाठी रावेर, नशिराबाद, एमआयडीसी पो. स्टे.येथे फिरवले गेले आणि अखेर २३ सप्टेंबर २०२५ रोजी जळगाव शहर पो.स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होऊनही आरोपी पोलीस अद्याप अटकेत नाही, यामुळे न्यायव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

गुन्ह्यात कलम वाढवण्याची मागणी
संशयीत आरोपीवर सध्या बीएनएस कलम ६९, ३१८(२),११५(२) ३५२, ३५१(३) व ३(५) यांनुसार गुन्हा दाखल आहे. परंतु जळगाव जिल्हा एकता संघटनेने जिल्हा पोलीस अधीक्षक व शहर पोलीस निरीक्षकांकडे दिलेल्या अर्जाद्वारे अतिरिक्त भारतीय न्याय संहिता कलमे ८१, ८२, ८३, ८७, १९६, १९८, व २०१ चा या गुन्ह्यात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. संघटनेने स्पष्ट केले की, आरोपी पोलिसाने धर्मांतर करून फसवणूकपूर्वक विवाह, द्विविवाह, खोटी दस्तऐवज मांडणी व लोकसेवक असूनही कायद्याचे उल्लंघन अशी गंभीर कृत्ये केली आहेत.

एकता संघटनेच्या मागण्या :
१) संशयीत आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला तातडीने अटक व निलंबन करण्यात यावे.
२) अतिरिक्त कलमे समाविष्ट करून तपास मजबूत करण्यात यावा.
३) तपास महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवून पीडितेचे बयान दुभाषकाच्या उपस्थितीत घेण्यात यावे.
४) पीडितेला जळगावात असताना पोलिस संरक्षण देण्यात यावे.
५) एफआयआर उशीराबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

कायदेशीर मार्गाने न्यायासाठी लढा : फारुक शेख
जळगाव जिल्हा एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी म्हटले आहे की, “जर हा प्रकार एखाद्या अल्पसंख्याक युवकाने केला असता तर काही हिंदुत्ववादी संघटनांनी समाजात रान पेटवले असते. मात्र आम्ही तसे न करता कायदेशीर मार्गाने न्यायासाठी लढा देत आहोत. हिंसा नव्हे न्याय पाहिजे.

शिष्टमंडळात यांचा होता समावेश
एकता संघटनेने सविस्तर तक्रार पोलीस निरीक्षक, शहर पो स्टे, जळगाव पोलिस अधीक्षक, पोलिस महानिरीक्षक, पोलिस महासंचालक, गृह राज्य मंत्री, महिला आयोग, मानवाधिकार आयोग, अल्पसंख्यक आयोगसह जळगाव जिल्हा महिला संघटनांना सुद्धा याच्या प्रति पाठविल्या आहेत. निवेदन देताना एकता संघटनेचे मुफ्ती खालिद, फारुक शेख, हाफिज रहीम पटेल, मौलाना गुफरान, अनिस शाह, मतीन पटेल, अँड.आवेश शेख, रज्जाक पटेल, कासिम उमर, मोहसीन पटेल आदींची उपस्थिती होती.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button