ड्रग्स प्रकरण : अबरार जळगाव पोलिसांच्या ताब्यात, २९ पर्यंत कोठडी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यासह राज्यभर गाजलेल्या एमडी ड्रग्स तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या शेख अबरार शेख मुख्तार याला पोलिसांनी मालेगावमध्ये अटक केली होती. दरम्यान, तेथील पोलीस कोठडी संपल्यानंतर जळगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार संशयीत आरोपी शेख अबरार शेख मुख्तार उर्फ अबरार कुरेशी हा गेल्या अनेक महिन्यांपासून जळगाव पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरत होता. काही दिवसांपूर्वीच त्याला मालेगाव विशेष पोलीस पथकाने अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी ६० ग्रॅम एमडी पावडर जप्त केली तर इतर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले होते.
मालेगाव येथील गुन्ह्यात त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली होती. दरम्यान, जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांत जळगाव पोलिसांनी अबरार यास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.






