
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यात अलीकडच्या काळात खून, प्राणघातक हल्ले, दंगल, चोरी अशा घटना वाढत असल्याने “जळगाव जिल्हा बिहार होतोय की काय?” अशी चर्चा स्थानिकस्तरावर होत असली तरी, गुन्हेगारीच्या अधिकृत आकडेवारीचा अभ्यास केल्यास एक वेगळेच आणि सकारात्मक चित्र समोर येते. नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी, आकडेवारीनुसार, जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत गुन्हेगारी लक्षणीयरीत्या घटली आहे. या यशाचे श्रेय थेट जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी राबविलेल्या कठोर उपाययोजना आणि प्रभावी उपक्रमांना जाते.
काय सांगते आकडेवारी..
सन २०२३, २०२४ आणि २०२५ (९ महिन्यांची आकडेवारी कंसात) ची तुलनात्मक आकडेवारी लक्षात घेतली असता गुन्हेगारी नियंत्रणात आल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
(गुन्ह्याचा प्रकार | २०२३ | २०२४ | २०२५ (९ महिने आकडेवारी) | घट (२०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये)
खून | ६६ | ६५ | ४२ (४८) | ६ ने कमी, प्राणघातक हल्ला | ११८ | ११५ | ७३ (८३) | ११ ने कमी, दरोडा | २३ | २१ | १२ (१५) | ३ ने कमी, जबरी चोरी | १४६ | १०५ | ३७ (७५) | ३८ ने कमी, घरफोडी | ३९९ | ३६६ | २२० (२६०) | ४० ने कमी, चोरी | २०५३ | १७४१ | ९०८ (१२०४) | २९६ ने कमी, दंगल | ४१३ | ३५१ | १९९ (२५१) | ५२ ने कमी, शासकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ला | १६ | २२ | १३ (१९) | ६ ने कमी, अत्याचार | ४७ | ५६ | ३१ (३४) | ३ ने कमी झाले आहेत.
गुन्हेगारीमध्ये मोठी घट
तीन वर्षाची आकडेवारी लक्षात घेतली असता चोरी (-२९६), दंगल (-५२), घरफोडी (-४०), आणि जबरी चोरी (-३८) यांसारख्या मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक आणि लक्षणीय घट झाली आहे. तसेच खून आणि प्राणघातक हल्ला यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाणही नियंत्रणात आले आहे. एकूणच चित्र सकारात्मक आहे.
प्रशासकीय कार्याची दखल आणि सन्मान
डॉ.महेश्वर रेड्डी यांनी राबविलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळेच गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश मिळाले. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल राज्य स्तरावरही घेण्यात आली. मुख्यमंत्री १०० दिवस कार्यक्रम अंतर्गत डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील जळगाव जिल्हा पोलिसांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘१०० दिवस कार्यक्रमात’ राज्यात तृतीय क्रमांक मिळवून दिला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः डॉ.महेश्वर रेड्डी यांचा सन्मान केला.






