भाजपचा मास्टरस्ट्रोक : जळगावच्या राजकारणात ‘पोलीस दम’, भास्कर पाटलांची एंट्री!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव : जळगाव पोलीस प्रशासनात दीर्घकाळ आपल्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवणारे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भास्कर पाटील यांनी नुकतेच आमदार राजुमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जि.एम.फाऊंडेशन येथे भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली आहे.
कठोर शिस्त, धाडसी निर्णयक्षमता आणि गुन्हेगारांवर वचक ठेवणारे अधिकारी म्हणून ओळख असलेले भास्कर पाटील यांनी आपल्या सेवाकाळात अनेक गंभीर आणि क्लिष्ट गुन्ह्यांचा छडा लावत पोलीस दलाची प्रतिमा उंचावली. त्यांच्या कार्यामुळे जळगाव शहर व परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क निर्माण झाला असून सर्व समाजघटकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासाचे नाते आहे.
भास्कर पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला संघटनात्मक बळ मिळणार असून, विशेषतः सर्वसामान्य नागरिक, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा पाठिंबा पक्षाकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सामाजिक सलोखा जपणारे, जनतेच्या अडचणी तत्परतेने समजून घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ७ मधून भास्कर पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, आगामी निवडणुकीत ते थेट मैदानात उतरण्याची दाट शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तवली जात आहे. त्यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे या प्रभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे, मात्र सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे भास्कर पाटील हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणूनच नव्हे तर सामाजिक भान असलेले नेतृत्व म्हणून पुढे येत असल्याचे चित्र सध्या जळगावच्या राजकारणात स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यांच्या प्रवेशाने भाजपची ताकद वाढली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.






