..अखेर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याला मिळाले नवीन पोलीस निरीक्षक

महा पोलीस न्यूज । भुषण शेटे । संपूर्ण राज्यासह जळगाव जिल्हयात गत काही दिवसांपासून पोलिस अधिकाऱ्यांच्या अदला- बदलीचे सत्र सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील हॉट पोलीस ठाणे समजल्या जाणाऱ्या चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची उचलबांगडी झाल्यानंतर त्याठिकाणी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर ४५ दिवसानंतर त्याठिकाणी पोलीस निरीक्षक म्हणून अमित मनेळ यांची वर्णी लागली आहे. नवीन निरीक्षक आल्यानंतर चाळीसगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था पुन्हा राखली जाईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहे.
गेल्या महिन्यात दि.१९ मे रोजी चाळीसगाव शहरातील एका खाजगी क्लास चालकाकडून पोलिस कर्मचाऱ्याने खंडणी घेतल्याचे प्रकरण आ.मंगेश चव्हाण यांनी उजेडात आणले होते. आ.मंगेश चव्हाण स्वतः पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसल्याने याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनला या पोलिस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा ही दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासातच तत्कालिन पो.नि. किरणकुमार कबाडी यांची उचलबांगडी करण्यात आली होती. घटनेला जवळपास ४५ दिवस उलटले असले तरी नव्या पोलीस निरीक्षकांची नेमणूक झालेली नव्हती. यामुळे शहर पोलिस स्टेशनचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यामार्फत सुरू होता.
जळगाव जिल्ह्यातील हॉट पोलीस ठाण्यांपैकी एक असलेल्या पोलीस ठाण्यात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे नाव होते. एकेकाळी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला पोलिस निरीक्षकपदी वर्णी लागावी म्हणून चढाओढ होत होती. परंतु गेल्या काही वर्षातील स्थिती लक्षात घेता त्याठिकाणी पदभार घेण्यासाठी कुणीच कसा इच्छुक नाही असा प्रश्न गेल्या ४५ दिवसापासून नागरिकांच्या मनात होता. चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला कायमस्वरूपी पोलिस निरीक्षक मिळणार कधी? याची उत्स्कृता पोलिस कर्मचाऱ्यांबरोबर शहरवासियांनी ही लागून आहे.
अखेर चर्चांना पुर्णविराम मिळाला असुन चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी अमित मनेळ यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज मंगळवारी दि.१ जुलै रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. अमित मनेळ हे यापूर्वी जळगाव जिल्ह्यात एसआयडीचे प्रभारी अधिकारी होते तसेच त्यानंतर त्यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात निरीक्षक पदावर असताना आपल्या कार्यकाळात त्यांनी गुन्हे शोध, कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
त्यांच्या चाळीसगाव येथील नियुक्तीमुळे शहरात कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.