ब्रेकिंग : एमआयडीसीमध्ये चटई कंपनीला भीषण आग, ५ बंब संपले तरीही आग सुरूच..

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या चटई कंपनीला रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची तीव्रता अधिक असून आग आणि धुराचे लोळ उठत आहेत. तासाभरात ४ ते ५ बंब संपले असून अद्यापही आग आटोक्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरात उमेश यशवंत चौधरी रा.सन्मित्र कॉलनी यांच्या मालकीची डी सेक्टरमध्ये सिद्धिविनायक इंडस्ट्रीज नावाची चटई कंपनी आणि सूर्यफूल गोडावून आहे. रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास कंपनीत सुरक्षारक्षकाच्या खोलीत अचानक आग लागली. कंपनीत तयार चटई आणि प्लास्टिक दाणे कच्चा माल असल्याने आग लागलीच पसरली. काही वेळातच संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
आग विझवण्यासाठी जळगाव अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी बंब घेऊन पोहचले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, तासाभरात ४ ते ५ बंब संपले असून अद्यापही आग आटोक्यात येण्याची लक्षणे दिसत नाही. काही वेळापूर्वी कंपनीत एक गॅस सिलेंडरचा देखील स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, तहसीलदार शीतल राजपूत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री गिरीश महाजन यांच्या जि.एम.फाउंडेशनचे पितांबर भावसार हे देखील रुग्णवाहिका घेऊन त्याठिकाणी पोहचले होते.