अंतर्गत स्पर्धेतून धरला नेम, अवैध धंद्यावाल्याच्या खांद्यावर बंदूक, पोलीस सहकाऱ्यांचा केला गेम

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची अंतर्गत स्पर्धा अजूनही वेगळ्याच वाटेने जात आहे. आपला जुगाड लावण्यासाठी दुसऱ्याला बाजूला करायला राजकीय आधार तर घेतलाच जातोय मात्र एसीबीचा ट्रॅप लावण्याची निंदनीय पद्धत पुन्हा सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे. नुकतेच अमळनेर येथे लाच लुचपच प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेल्या २ पोलीस कर्मचाऱ्याचा देखील तोच किस्सा आहे.
जळगाव जिल्हा पोलीस दलात गेल्या काही वर्षापासून नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. खुर्ची, बीट आणि कलेक्शनच्या मोहापायी आपल्याच सहकाऱ्यांच्या नोकरीवर गदा आणण्यासाठी वाटेल ते प्रयोग केले जात आहे. जुने व्हिडिओ व्हायरल करणे, राजकारण्यांचे कान भरणे, एसीबीची कारवाई घडवून आणणे असे प्रकार सुरू आहेत. गेल्या ५ वर्षात याच प्रकारातून किमान ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नुकसान झाले असावे.
दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गेम
पोलीस प्रशासनातील प्रत्येकाच्या संपर्कात कमी अधिक प्रमाणात अवैध धंदे चालक मालक असतातच, त्यात काही गुन्हेगार देखील असतात. आपल्याशी पटत नसलेल्या किंवा एखाद्याला बाजूला सारण्यासाठी पोलीस नेमका तोच धागा पकडतात. अवैध धंदेवाल्यांकडे असलेल्या पुराव्यांच्या माध्यमातून किंवा त्याला हाताशी धरून एसीबीमार्फत लाच प्रकरणात अडकवले जाते. गेल्या काही वर्षात अनेक कर्मचाऱ्यांना अडकवून बाजूला सारण्यात आले आहे. नुकतेच अमळनेर येथे घडलेला प्रकार देखील असाच आहे. काही वर्षापूर्वीच आलेले कर्मचारी पुढे जात असल्याने दुसऱ्याने हा डाव साधल्याची चर्चा आहे.
राजकारण्यांचा वाढता हस्तक्षेप
पोलीस प्रशासनात राजकारणी, पुढारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यात हे प्रमाण अधिक आहे. जळगावात बदलीसाठी राजकीय दबाव होताच मात्र आता बीट आणि कलेक्शन देण्यासाठी देखील राजकीय दबाव निर्माण केला जातो. राजकीय हस्तक्षेप वाढत असल्यानेच पोलीस अधिकाऱ्यांना हवे तसे काम करता येत नाही आणि प्रशासनाची प्रतिमा मलिन होते.
सुडाच्या भावनेने दुसराही ठरतो बळी
एखाद्याने आपल्याला अडचणीचा ठरणारा अधिकारी किंवा कर्मचारी बाजूला करण्यासाठी डाव रचल्यानंतर त्याचा तर गेम होतोच मात्र तो देखील सुडाच्या भावनेतून पेटून उठतो. आपला गेम करणाऱ्याला बाजूला करण्यासाठी तो देखील सापळा रचतो आणि त्याला देखील अडकवतो. त्यामुळे दोन्ही शिक्षा भोगतात आणि पोलीस दलाची प्रतिमा डागाळते. हेच सुरू राहिले तर भविष्यात कर्मचारीच आमनेसामने देखील भिडू शकतील.
‘गॅस’मुळे निकम साहेब ‘गॅस’वर
एका व्यक्तीकडून अवैध गॅस रिफिलिंग सेंटरसाठी १२ हजार लाच स्वीकारल्याबद्दल अमळनेर पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कॉन्स्टेबल आणि एका खाजगी इसमावर एसीबीने गुन्हा दाखल केला. जळगावात एमआयडीसी पोलीस ठाण्यात असताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची बदली करण्यात आली होती. गेल्याच आठवड्यात निकम एलसीबी निरीक्षकपदाच्या शर्यतीत होते. नेमके एसीबीने केलेली कारवाई देखील अवैध गॅस रिफिलिंग सेंटरसाठी झाली. हा निव्वळ योगायोग असला तरी यामागे देखील स्पर्धेचे राजकारण असू शकते. ट्रॅप झालेले दोन्ही कर्मचारी देखील निकम यांच्या मर्जीतील असल्याने त्यांनाच यात गोवून विरोधकांनी आपला हेतू सिद्ध करून घेतला.






