भडगाव पोलिसांनी ६ तासांत उघडकीस आणला चोरीचा गुन्हा; ५ लाखांचे ट्रॅक्टर हस्तगत

भडगाव, प्रतिनिधी: भडगाव पोलिसांनी एका चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या सहा तासांत छडा लावून आरोपीला अटक केली आहे. शासकीय जागेतून चोरीला गेलेले ५ लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर पोलिसांनी हस्तगत केले असून, भडगाव पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
काय आहे प्रकरण?
भडगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरला महसूल विभागाने ताब्यात घेतले होते. हे ट्रॅक्टर भडगाव येथील शासकीय आयटीआयमध्ये ठेवण्यात आले होते. या ठिकाणाहून हे ट्रॅक्टर चोरीला गेल्याची तक्रार नायब तहसीलदार सुधिर किटकुल सोनवणे यांनी १७ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान भडगाव पोलिसांत दाखल केली होती. या तक्रारीनुसार, भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची तपास मोहीम
गुन्हा दाखल होताच भडगाव पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सुनिल कैलास पाटील (रा. गिरड, ता. भडगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ५ लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर जप्त केले आणि त्याला अटक केली.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश शर्मा, पो.उप.निरीक्षक सुशील सोनवणे, पो.ना. मनोहर पाटील, पो.कॉ. प्रवीण परदेशी आणि चालक पो.कॉ. संजय पाटील यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.ना. भूषण पाटील करत आहेत.
केवळ सहा तासांत चोरीचा छडा लावल्याबद्दल भडगाव पोलिसांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. नागरिकांनी पोलिसांकडून अशाच जलद कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.






