महामार्गावरच्या शोरुममध्ये चोरी करणारी टोळी अटकेत!

महामार्गावरच्या शोरुममध्ये चोरी करणारी टोळी अटकेत!
जळगाव: प्रतिनिधी ;- शहराजवळील महामार्गावर असलेल्या चौधरी टोयोटा आणि सातपुडा ऑटोमोबाईल या नामांकित चारचाकी शोरुममध्ये झालेल्या चोरीप्रकरणी नशिराबाद पोलिसांनी मध्यप्रदेशातून तिघांना अटक केली आहे.
गेल्या महिन्यात जळगाव-भुसावळ महामार्गावर असलेल्या या शोरुममध्ये चोरट्यांनी मोठा हल्ला चढवला होता. त्यांच्या हाती फारसा मुद्देमाल लागला नसला तरी, त्यांनी शोरुममध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड करत लाखोंचे नुकसान केले.
नशिराबाद पोलिसांनी तपास हाती घेतला असता, सपोनि ए.सी. मनोरे यांना ही चोरी मध्यप्रदेशातील सराईत गुन्हेगारांनी केल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी शोधमोहीम राबवत खंडवा येथे धडक कारवाई केली आणि मेवालाल पिसीलाल मोहिते (३३, बोरगाव), कमलेश उर्फ कालू मन्नलाल पवार (४०, रोसिया, जि. खंडवा), अजय धुलजी चव्हाण (२२, घटिया गराठे, मनसौर) या तिघांना अटक केली.
ही टोळी अत्यंत शिताफीने चोऱ्या करत असल्याचे उघड झाले असून, त्यांच्याकडून काही धारदार शस्त्रे आणि चोरीतील साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांचे पोहेकॉ योगेश वराडे, युनूस शेख, गिरीश शिंदे, पोकॉ आरिफ तडवी यांच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत मोठा गुन्हा उघडकीस आणला. ही कारवाई केल्याबद्दल पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अटक केलेल्या आरोपींची सखोल चौकशी सुरू असून, या टोळीशी संबंधित आणखी काही गुन्हेगारी कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे. पुढील तपास नशिराबाद पोलिस करत आहेत.