Politics

पाचोरा पालिकेवर शिंदेसेनेचा झेंडा

पाचोरा पालिकेवर शिंदेसेनेचा झेंडा

सुनिता पाटील नगराध्यक्ष; २८ पैकी २२ जागांवर शिवसेना (शिंदे) गटाचा कब्जा

पाचोरा | प्रतिनिधी : पाचोरा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ने अभूतपूर्व यश मिळवत नगराध्यक्षपदासह नगरपरिषदेवर स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एकूण २८ जागांपैकी तब्बल २२ जागांवर विजय मिळवत शिंदे गटाने सत्ता आपल्या हातात घेतली, तर भारतीय जनता पक्षाला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. उबाठा गट व काँग्रेसला मात्र या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही.

नगराध्यक्षपदासाठी झालेल्या थेट लढतीत शिवसेना (शिंदे) गटाच्या सुनिता किशोर पाटील यांनी भाजपच्या सुचेता दिलीप वाघ यांचा तब्बल ११,३४८ मतांच्या फरकाने पराभव करत दणदणीत विजय मिळवला. सुनिता पाटील यांना एकूण २५,८६५ मते (२५,८११ प्रत्यक्ष व ५४ पोस्टल) मिळाली, तर सुचेता वाघ यांना १४,५१७ मते (१४,५१० प्रत्यक्ष व ७ पोस्टल) मिळाली.

वाघ–पाटील कुटुंबीयांच्या लढती चर्चेत

या निवडणुकीत राजकीय घराण्यांतील लढती विशेष चर्चेचा विषय ठरल्या. आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांनी प्रभाग क्रमांक ९ मधून २,४८३ मते मिळवत सर्वाधिक मताधिक्याचा विजय नोंदवला. त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर १,५३४ मतांची निर्णायक आघाडी घेतली.
दुसरीकडे, माजी आमदार दिलीप वाघ यांचे पुत्र भूषण वाघ यांना प्रभाग क्रमांक १ मधून ८७३ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र वाघ कुटुंबासाठी दिलासादायक बाब म्हणजे दिलीप वाघ यांचे पुतणे सुरज संजय वाघ यांनी प्रभाग क्रमांक १० मधून केवळ १९ मतांच्या फरकाने विजय मिळवला.

नगरपरिषदेत शिंदे गटाचे संख्याबळ भक्कम

शिवसेना (शिंदे) गटाकडून मनिषा बाविस्कर, किशोर बारवकर, संजय गोहील, वैशाली चौधरी, सतीष चेडे, रफिक बागवान, रशिदाबी शेख, खनसा बागवान, संजय चौधरी, रहेमान तडवी, प्रांजल सावंत, वर्षा व प्रवीण ब्राह्मणे, मिनाक्षी एरंडे, गणेश पाटील, सुमित व दीपाली पाटील, जयश्री पाटील, प्रियंका व संदिप पाटील, प्रदीप वाघ आणि सुरेखा पाटील हे नगरसेवक विजयी झाले आहेत.

भाजपाकडून कविता विनोद पाटील, सुरज संजय वाघ, अमरीन देशमुख, राहुल गायकवाड (पुरस्कृत), कविता उमेश हटकर व गोपालदास वासवानी यांनी नगरसेवकपद पटकावले आहे.

निकाल जाहीर होताच शहरात शिवसेना कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे, फटाके व गुलाल उधळत जल्लोष साजरा केला. आमदार किशोर पाटील यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना, “जनतेने विकासाच्या कामांना कौल दिला आहे. पाचोरावासीयांना दिलेली दररोज पाणीपुरवठ्याची हमी पूर्ण केली जाईल,” असा विश्वास व्यक्त केला.
भाजपाचे अमोल शिंदे यांनी पराभव स्वीकारत, “चुका दुरुस्त करून पुढील काळात अधिक ताकदीने काम करू,” अशी प्रतिक्रिया दिली.

 

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button