दहशत माजवणाऱ्या दोन आरोपींना गावठी पिस्तुलासह अटक

दहशत माजवणाऱ्या दोन आरोपींना गावठी पिस्तुलासह अटक
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव: जिल्ह्यात दहशत माजवण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अटक केली आहे. आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चरणसिंग चव्हाण आणि पंकज चव्हाण हे दोघे वरणगाव येथील फुलगाव पुलाजवळ गावठी पिस्तूल घेऊन येणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, या माहितीचे गांभीर्य लक्षात घेत, पोलिसांनी तात्काळ एक पथक तयार केले.
पथकाने सापळा रचून काळ्या-लाल रंगाच्या पल्सर मोटरसायकलवर (क्रमांक एमपी ६८ झेडसी ३३५७) आलेल्या दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांची नावे चरणसिंग उखा चव्हाण (वय ३६, रा. चौडी, जि. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) आणि पंकज रतनसिंग चव्हाण (वय २५, रा. मोरझिरा, ता. मुक्ताईनगर) अशी असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी त्यांच्या झडतीत एक गावठी बनावटीचा पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, मोटरसायकल आणि दोन मोबाईल असा एकूण १ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या आरोपींनी विनापरवाना ही शस्त्रे दहशत माजवण्याच्या हेतूने बाळगल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली. या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे आणि पो.ह. यशवंत टहाकळे, प्रेमचंद सपकाळे, प्रितम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, बबन पाटील, रविंद्र चौधरी, सचिन घुगे आणि भरत पाटील या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.






