
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील देविदास कॉलनी येथील महेश भास्करराव सावदेकर (वय ५२) यांनी झालेल्या सततच्या मानसिक तणावामुळे विष प्राशन करून आपले जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना सोमवारी उघड झाली. कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या सावदेकर यांना संस्थेकडून मिळत असलेल्या वागणुकीमुळे ते तणावात होते, असा आरोप त्यांच्या परिवाराने केला आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या आणि मिळालेल्या माहितीनुसार, महेश सावदेकर हे शहरातील एका महाविद्यालयात करारावर काम करत होते. सोमवारी त्यांच्या घरी कोणी नसताना त्यांनी विषारी पदार्थ घेतला. काही वेळाने शेजाऱ्यांनी त्यांना घरातच बेशुद्ध अवस्थेत पडलेले पाहिले. परिस्थिती गंभीर असल्यामुळे तत्काळ त्यांच्या पत्नी आणि भावाला कळविण्यात आले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले; मात्र उपचारांपूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. एमआयडीसी पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
कुटुंबीयांचे गंभीर आरोप
महेश सावदेकर यांच्या पत्नी यशोधरा यांनी गंभीर आरोप करताना सांगितले की, पती अनेक वर्षे करारावर काम करत असूनही त्यांना कायम करण्याचे आश्वासन देण्यात आले. कायम करण्यासाठी एका व्यक्तीने पंधरा लाख रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला. वेतन जास्त दाखविले जात असे ते प्रत्यक्षात मिळत नसे; तसेच जास्त रकमेची सही घेतली जात होती. दीड महिन्यांपूर्वी अचानक कामावरून काढून टाकल्यामुळे ते प्रचंड तणावात होते. मध्यस्थी म्हणून एका व्यक्तीने यात भूमिका बजावल्याचेही त्यांनी सांगितले.
पूर्वीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न
कामासंबंधी निर्माण होत असलेल्या ताणामुळे सावदेकर यांनी यापूर्वीही २१ जून रोजी हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर मानसिक ताण वाढत चालल्याचे ते सांगत होते. महेश सावदेकर यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या पत्नीने केली आहे. अचानक झालेल्या या घटनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मू.जे.त आणला मृतदेह, पोलीस पथक दाखल
महेश सावदेकर यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक हे संतप्त झाले असून त्यांनी थेट मृतदेह सोबत घेऊन मू.जे.महाविद्यालय गाठले. त्याठिकाणी जोरदार आक्रोश करीत विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. महाविद्यालयात रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, कर्मचारी, क्यूआरटी पथकासह पोहचले आहेत.
कुटुंबियांची चर्चा : मुलाचे शिक्षण, पत्नीला कंत्राटी नोकरी देणार
सध्या सावदेकर यांचे कुटुंबीय संस्था प्रशासनाशी चर्चा केली आहे. दरम्यान, पंधरा वर्षापूर्वी दिलीप रामू पाटील हे व्यवस्थापन कमिटीवर होते. मी शिक्षण संस्था चालक होतो. त्यांचा फोन आल्यानंतर त्या व्यक्तीला नोकरी देण्यात आली. सुरुवातीला ते अभ्यासिकेत होते ते बंद पडल्यावर त्यांना दुसरीकडे बदली करण्यात आली. जून महिन्यापासून ते कामाला आलेला नाही. १५ दिवसापूर्वी तो भेटायला आला. दिलीप रामू पाटील यांनी पैसे घेतले याची १५ वर्षात तक्रार केलेली नाही. मी आजवर कुणाकडूनही पैसे घेतले नाही. माणुसकी म्हणून मयत महेश सावदेकर यांच्या मुलाचे १२ वी पर्यंत शिक्षण मोफत करून देणार आणि पत्नीला देखील शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून नोकरी देण्याचे आश्वासन दिले. दिलीप पाटील यांच्याशी आम्ही संपर्क संपर्क केला मात्र ते बाहेरगावी असल्याचे त्यांनी सांगितले, अशी माहिती के.सी.इ.एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेंडाळे यांनी सांगितले.
पहा संपूर्ण व्हिडिओ :






