जळगावकरांनो सावधान.. गिरणेच्या पाणी पातळीत होणार वाढ!
गिरणा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा : चणकापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

महा पोलीस न्यूज । दि.२३ सप्टेंबर २०२५ । गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने चणकापूर धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सद्यस्थितीत १७ हजार ९९७ क्युसेक विसर्ग सुरू असून गिरणा नदीला पूर येण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील चणकापूर धरणातून गिरणा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज सकाळी १० वाजेपर्यंत धरण ९९% भरले असून, सध्या १७,९९७ क्युसेक पाणी नदीत सोडले जात आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने, धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. यामुळे, भविष्यात धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा विसर्ग आणखी वाढवावा लागेल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. याव्यतिरिक्त, हरणबारी आणि केळझर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू असल्यामुळे, गिरणा, मोसम आणि आराम नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदीत पाणी सोडण्यात आल्याने नागरिकांनी नदीपात्रात किंवा नदीकाठाजवळ जाऊ नये. आपल्या जनावरांना, शेतीतील वस्तू आणि पाणी उपसण्याचे पंप सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने सर्व संबंधित शासकीय यंत्रणांना या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.






