विनोद शिपलेकर हत्या प्रकरणातील आरोपींना २४ तासांत अटक

विनोद शिपलेकर हत्या प्रकरणातील आरोपींना २४ तासांत अटक
यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
यवतमाळ: – स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळच्या पोलिसांनी अवघ्या २४ तासांत खून, खुनाचा प्रयत्न आणि वाहन चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांची उकल करत दोन आरोपींना अटक केली. मृतक विनोद शंकर शिपलेकर याच्या हत्येप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ५५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१० मार्च २०२५ रोजी फिर्यादी कमलेश सुर्यभान वाठोरे (रा. कोलाम पोड, लोहारा, यवतमाळ) यांनी पोलीस ठाणे लोहारा येथे तक्रार दिली. त्यांनी सांगितले की, त्यांचा साळा विनोद शिपलेकर याचा एस. के. बारच्या मागील मोकळ्या जागेत अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने खून केला आहे.
या तक्रारीनंतर पोलिसांनी अपराध क्रमांक ९८/२०२५ नुसार कलम ३०२ भादंवि अंतर्गत गुन्हा नोंदवला. प्रकरणाच्या गांभीर्यामुळे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.
२४ तासांत आरोपी जेरबंद
पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक विश्लेषण करून आरोपींची ओळख पटवली.
शिवम प्रेमदास राठोड (वय १९, रा. एम.आय.डी.सी., लोहारा) वंश संजय कोटेकर (वय १९, रा. मुंगसाजी नगर, लोहारा)गोपनीय माहितीच्या आधारे, आरोपी चोरीच्या मारुती ८०० (MH-29-J-309) कारसह नेर रोडवरील येलगुंडा परिसरात लपले होते. सपोनि संतोष मनवर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने आरोपींचा पाठलाग करून सापळा रचत त्यांना अटक केली.
तपासादरम्यान आरोपींनी ९ मार्च २०२५ रोजी रात्री एस. कुमार बारमध्ये एका इसमासोबत वाद झाल्याचे, त्याला बाहेर चाकू मारून गंभीर जखमी केल्याचे, आणि त्यानंतर विनोद शिपलेकर याच्यासोबत वाद करून त्याचा खून केल्याची कबुली दिली.इतकेच नव्हे, गुन्हा करण्यासाठी आरोपींनी एक दुचाकी आणि घटनास्थळावरून पळून जाण्यासाठी चारचाकी वाहन चोरी केल्याचेही उघड झाले.दोन्ही आरोपींकडून ५५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी त्यांना पोलीस ठाणे लोहारा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने आणि पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष मनवर,सफौ योगेश गटलेवार,पोहवा अजय डोळे, विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, निलेश राठोड, कविश पाळेकर, रितुराज मेडवे पोशि दिगांबर पिलायन, आकाश सहारे यांनी मेहनतीने गुन्हा उघडकीस आणला. पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.