चाळीसगावात ऑफिसवर डल्ला : ४५ लाख रोकड, हार्डडिस्क व पेनड्राईव्ह चोरी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या सुपरिअल्टी बिल्टकॉन एलएलपी, मुंबई या कंपनीच्या कार्यालयातून तब्बल ४५ लाख १६ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कंपनीचे प्रकल्प संचालक राजेंद्रसिंग रामसिंग पाटील (रा. पाचोरा) यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुपरिअल्टी बिल्टकॉन एलएलपी कंपनीने मालेगाव रोड परिसरात शिवनेरी पार्क या नावाने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचा प्रशासकीय व आर्थिक कारभार छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कार्यालयातून चालतो. दैनंदिन खर्च, मजुरांचे वेतन, साहित्य खरेदी यासाठी कार्यालयात नेहमीच मोठ्या प्रमाणात रोकड ठेवली जाते.
कार्यालयात होते ४५ लाख
३० ऑगस्ट रोजी कार्यालयात आणि प्रकल्पस्थळी मिळून ४५ लाख रोकड, तसेच ठेकेदारांनी सुरक्षेसाठी जमा केलेली रक्कम ठेवण्यात आली होती. ही रोकड अकाऊंटन्ट गौरव शिरुडे यांच्या ताब्यात होती. मात्र ते रजेवर गेल्याने पैसे कामकाज बघणारे दीपक पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले होते.
चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद
२ सप्टेंबर रोजी सकाळी ७.२६ वाजता सीसीटीव्हीत एक युवक वॉचमनकडून चावी घेऊन कार्यालयात प्रवेश करताना दिसून आला. हातात झाडू घेऊन तो साफसफाई करत असल्याचे भासवत आतमध्ये फिरला. त्यानंतर त्याने कपाटातील रोकड व काही महत्त्वाची कागदपत्रे हातोहात पिशवीत टाकली. फुटेजमध्ये तो काळी पिशवी गोणीत ठेवून बाहेर निघून जाताना स्पष्ट दिसत आहे.
वॉचमनला दिली खोटी माहिती
कार्यालयातील वॉचमन सुरेश तांबे यांच्याकडे चौकशी केली असता, आरोपीने “मला साफसफाईच्या कंत्राटदार राहुल नकवाल यांनी पाठवले आहे” असे सांगून विश्वास संपादन केला होता. मात्र, चौकशीअंती राहुल नकवाल यांनी असा कोणताही आदेश दिला नसल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर फुटेजमधील युवक हा साईनाथ पंढरीनाथ चौधरी (रा. मराठा मंगल कार्यालय, चाळीसगाव) असल्याची खात्री झाली.
चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल
घटनेनंतर प्रकल्प संचालक राजेंद्रसिंग पाटील यांनी कंपनीच्या वरिष्ठांना कळवून दि.४ सप्टेंबर रोजी पोलिसांत धाव घेतली. ४५ लाख रोकड, १६ हजाराची हार्डडिस्क आणि ३०० रुपयांचा पेनड्राईव्ह असा ऐवज त्याने चोरून नेला आहे. संशयीत आरोपी साईनाथ चौधरीचा ठावठिकाणा सापडत नसल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शहरभर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासोबतच त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडे शोधमोहीम सुरू आहे.
चाळीसगावसह जिल्ह्यात खळबळ
ही घटना चाळीसगाव शहरात प्रचंड चर्चेचा विषय ठरत असून, दिवसाढवळ्या कार्यालयात घडलेल्या लाखोंच्या चोरीने सुरक्षेच्या दृष्टीने अनेक प्रश्नचिन्हे निर्माण केली आहेत. दरम्यान, मुख्य परिसरातून आणि ओळख दाखवून डल्ला मारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.






