ब्रेकिंग : महसूल अधिकाऱ्यावर वाळूमाफियांचा हल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । पिंप्राळा शिवारात अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरला थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला तिघांनी मिळून मारहाण केल्याची गंभीर घटना पहाटे घडली. या प्रकरणी अधिकारी राजू कडू बा-हे (वय ५३, रा.श्रीधर नगर, रामानंदनगर) यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, राजू कडू हे पिंप्राळा (जळगाव) येथे दिड वर्षांपासून ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दि.१ डिसेंबर रोजी पहाटे ३.३४ वाजता ते पिंप्राळा शिवारातील खंडेरावनगर परिसरातून तलाठी कार्यालयाकडे जात असताना त्यांना निळ्या रंगाचा ‘स्वराज’ कंपनीचा वाळूने भरलेला ट्रॅक्टर दिसला. त्यांनी ट्रॅक्टर थांबवून उत्खनन परवान्याबाबत चालकाला विचारणा केली.
यावेळी अचानक त्या ट्रॅक्टरच्या मागून काळ्या रंगाच्या बजाज मोटारसायकलवरून मनोज रमेश भालेराव (ज्यांच्यावर यापूर्वीही वाळू वाहतुकीची कारवाई झाली होती) व त्याचा मित्र फैजल खान हे तेथे आले. “हे ट्रॅक्टर माझेच आहे, तुम्ही यापूर्वी देखील माझे ट्रॅक्टर पकडले होते,” असे म्हणत मनोज भालेराव याने वाद घातला. त्याने बुवा नावाच्या ट्रॅक्टर चालकाला हाक मारली व ट्रॅक्टर घेऊन जाण्यास सांगितले.
कॉलर पकडून मारहाण, शिवीगाळ
फिर्यादीनुसार, मनोज भालेराव हा अचानक त्यांच्या अंगावर धावून आला. त्याने राजू बार्हे यांच्या शर्टाची कॉलर पकडून त्यांच्या डाव्या गालावर जोरदार चापट मारली व त्यांना ढकलून दिले. शिवाय आई-बहिणीवरून अश्लील शिवीगाळ केली. त्याच वेळी मनोजने आपल्या सोबती फैजल खान यास “त्याच्याकडील टॅमीने मारा” असे सांगितले. त्यावर फैजल हा हातातील टॅमी (लोखंडी वस्तू) काढून फिर्यादीवर झेपावला. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून फिर्यादी बाजूला झाले. दरम्यान, बुवा नावाचा ट्रॅक्टर चालक शिवीगाळ करत त्यांनी थांबवलेला ट्रॅक्टर बळजबरीने घेऊन पळून गेला.
स्थानिक लोक जमल्याने आरोपींचा पळ
फिर्यादी पथकातील सहकाऱ्यांना फोन करीत असताना आजूबाजूच्या लोकांची जमवाजमव झाली. त्यांना पाहून मनोज भालेराव आणि फैजल खान हे दोघेही मोटारसायकलवरून पळून गेले. नागरिकांनी त्यांचा शोध घेण्याचे पाहिले मात्र ते पळून जाण्यात यशस्वी ठरले.
रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल
फिर्यादीनुसार मनोज रमेश भालेराव, फैजल खान आणि ट्रॅक्टर चालक बुवा (पूर्ण नाव-पत्ता अज्ञात) यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे, धमकी देणे, अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर पळवून नेणे यांसह इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामानंदनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तडीपार करणार?
एकीकडे महसूल अधिकारी नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक कामात व्यस्त असताना दुसरीकडे वाळू माफियांची हिंमत वाढली आहे. धामणगाव येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले जाते तर जळगावात महसूल अधिकाऱ्यावर हल्ला होतो. वाळूमाफियांना लगाम घालण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि प्रांताधिकारी विनय गोसावी एमपीडीए, तडीपार, प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा सपाटा लावतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.






