तापी नदीपात्र परीसरात महसूल विभागाची धडक कारवाई : दोन डंपर व एक जेसीबी जप्त!

तापी नदीपात्र परीसरात महसूल विभागाची धडक कारवाई : दोन डंपर व एक जेसीबी जप्त!
सुभाष धाडे मुक्ताईनगर
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरातील भोकरी भागात अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाने बुधवारी (१५ ऑक्टोबर) पहाटे पावणे चारच्या सुमारास मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन डंपर व एक जेसीबी मशीन जप्त करण्यात आली आहे.
तहसीलदार गिरीश वखारे यांना रात्रीच्या वेळेस अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच त्यांनी तत्काळ पथक तयार केले. त्यानंतर नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच महसूल विभागाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला.
कारवाईदरम्यान अंतुरली आऊट पोस्टचे हवालदार व पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते. महसूल पथकाने घटनास्थळावरून दोन डंपर व एक जेसीबी मशीन ताब्यात घेतली असून, ही सर्व वाहने सध्या अंतुरली आऊट पोस्ट पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती तहसीलदार गिरीश वखारे यांनी दिली.
जप्त करण्यात आलेल्या वाहनांपैकी एक डंपर आणि जेसीबी विजय दिनकर पाटील (रा. भोकरी, ता. मुक्ताईनगर) यांच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. तर दुसऱ्या डंपरवर नंबर नसल्याने त्याचे आरसी बुक महसूल विभागाने मागविले आहे.
या कारवाईमुळे भोकरी परिसरातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर मोठा आळा बसणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले. महसूल विभागाने पुढील तपास सुरू केला आहे.






