ब्रेकिंग : जळगावात पकडले एमडी ड्रग्स, एलसीबीची दमदार कामगिरी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील मेहरुण बगीचा परिसरात जळगाव एलसीबीच्या पथकाने सापळा रचून एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कारवाई केली असून एकाने पळ काढला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी विशेष मोहीम हाती घेत ड्रग्स माफियांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. एलसीबीचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने गोपनीय माहिती काढून मेहरुण बगीचातील जे.के.पार्क जुन्या स्विमिंग टॅंकजवळ सापळा रचत छापा टाकला. पथकाने मोहम्मद हनीफ पटेल वय-३५ रा.मास्टर कॉलनी यास पकडले तर दुसऱ्याने पळ काढला.
८२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
एलसीबीच्या पथकाने मोहम्मद हनीफ पटेल याच्याकडून ६० हजाराची ६ ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर, २ मोबाईल असा ८२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस हवालदार अक्रम शेख यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, कर्मचारी योगेश घुगे करीत आहे.






