कुटूंब गणेश विसर्जनाला, घरी चोरट्यांनी मारला डल्ला

महा पोलीस न्यूज । दि.७ सप्टेंबर २०२५ । गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या आवाजाचा फायदा घेत जळगाव शहरात चोरट्यांनी घरफोडी करत लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना दि.६ सप्टेंबर रोजी घडली आहे. दूध फेडरेशन रोड येथील श्री अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नारायणी पार्क, दूध फेडरेशन रोड येथील श्री अपार्टमेंटमध्ये राहणारे प्रसाद पवार हे महापालिका कर्मचारी आहेत. दि.६ रोजी ते गणेश विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तासाठी कर्तव्य बजावत होते. दुपारच्या सुमारास त्यांच्या कुटुंबीयांनी घराला कुलूप लावून विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी परिसरात गेले होते.
संधीचा फायदा घेऊन मारला डल्ला
घरी कोणीही नसल्याची संधी साधून आणि परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वाद्याचा आवाज येत असल्याचा फायदा घेत दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी सुमारे ४ तोळे सोने, चांदी तसेच रोकड असा लाखोंचा ऐवज चोरून नेला आहे.
चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
घराच्या परिसरात गणपती मंदिर असल्याने ढोल-ताशांच्या गजरात ही चोरी झाल्याने कुणाच्याही लक्षात आले नाही. संध्याकाळी कुटुंबीय घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस तपास सुरू आहे.






