तरसोद रेल्वे पुलाच्या बांधकामाला वेग : सहा दिवसांचे नियोजन

तरसोद रेल्वे पुलाच्या बांधकामाला वेग : सहा दिवसांचे नियोजन
जळगाव जळगाव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 (जुना 6) वरील तरसोद येथील रेल्वे मार्गावर पूल बांधण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या सहा दिवसांत दररोज सकाळी 9.30 ते 11 या वेळेत हे काम हाती घेण्यात येणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून या कामाची आखणी करण्यात आली असून, सुमारे 225 कुशल व अकुशल कामगार यासाठी कार्यरत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे स्थानिक प्रकल्प संचालक शिवाजी पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजीव लोखंडे, तसेच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी हे या कामावर सतत लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे कामाचा वेळोवेळी आढावा घेत असून नियोजित कालावधीत काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. या पुलामुळे महामार्गावरील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असून, भविष्यात नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळणार आहे.
येथे काम करणाऱ्या कर्मचारी यांच्या आरोग्याच्या बाबतीत सर्व प्रकारची काळजी घेतली जात असून तिथे एक सुसज्ज रुग्णवाहिकाही ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.