महापालिकेच्या मैदानात दुसऱ्या आमदार पुत्राची बाजी

महापालिकेच्या मैदानात दुसऱ्या आमदार पुत्राची बाजी
भाजपचे विशाल भोळे प्रभाग ७ ‘क’ मधून बिनविरोध; महायुतीचा सहावा विजय
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत माघारीच्या शेवटच्या दिवशी बिनविरोध विजयांची मालिका कायम राहिली असून, शहराचे आमदार राजूमामा भोळे यांचे सुपुत्र विशाल सुरेश भोळे यांनी प्रभाग क्रमांक ७ ‘क’ मधून बिनविरोध निवड निश्चित करत महापालिकेच्या मैदानात दुसऱ्या आमदार पुत्राची बाजी मारली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर दुपारी त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
याआधी चोपडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांची प्रभाग क्रमांक १८ ‘अ’ मधून बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर आज भाजपकडून विशाल भोळे यांच्या बिनविरोध विजयामुळे महायुतीसाठी सहावा विजय नोंदवला गेला आहे.
माघारीच्या प्रक्रियेत शिवसेना (शिंदे गट)च्या उमेदवारांनीही विजयाचा चौकार पूर्ण केला आहे. प्रभाग क्रमांक ९ ‘ब’ मधून अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने प्रतिभा देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. याआधीच प्रभाग ९ ‘अ’ मधून मनोज चौधरी, तर प्रभाग १९ ‘अ’ मधून रेखा चुडामण पाटील यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
महायुतीचे खाते सर्वप्रथम भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला मोहन बेंडाळे यांनी प्रभाग क्रमांक १२ ‘ब’ मधून बिनविरोध निवड होत उघडले होते. त्यानंतर सलग बिनविरोध निवडींमुळे महायुतीने मतदानाआधीच सहा जागांवर विजय मिळवला आहे.
महापालिकेच्या ७५ जागांसाठी आज, २ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. विशाल भोळे यांच्या विजयाचे वृत्त समजताच भाजप कार्यकर्त्यांनी महापालिका प्रांगणात गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
दरम्यान, मतदान होण्यापूर्वीच सहा जागांवर यश मिळाल्याने महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच भाजप व शिवसेना (शिंदे गट)च्या नेत्यांच्या रणनीतीला हे मोठे यश मानले जात आहे. उर्वरित ६९ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, या बिनविरोध विजयांचा थेट लढतीवर काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






