‘जळगावात बॉम्ब फुटणार’; पोलिसांच्या ११२ या हेल्पलाईनवर खोटी माहिती देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

‘जळगावात बॉम्ब फुटणार’; पोलिसांच्या ११२ या हेल्पलाईनवर खोटी माहिती देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
जळगाव: जळगावात ‘बॉम्बस्फोट’ होणार असल्याची खोटी माहिती पोलिसांच्या ११२ या हेल्पलाईनवर देणाऱ्या एका तरुणावर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची दिशाभूल करणे या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे.
किरण लक्ष्मण पाटील (वय २८, रा. कृष्णापुरी, ता. पाचोरा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. २७ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता पोलीस कॉन्स्टेबल शरद मांगो पाटील त्यांच्या कर्तव्यावर असताना किरण पाटीलने ११२ या क्रमांकावर फोन केला. त्याने “उद्या जळगावात बॉम्ब फुटणार आहे, आम्हाला पोलिसांची मदत हवी आहे” अशी खोटी माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी तातडीने चौकशी केली असता, हा फोन केवळ खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी केल्याचे उघड झाले.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शरद पाटील यांनी फिर्याद दिली असून, पाचोरा पोलीस ठाण्यात किरण पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






