रावेरला गणेश विसर्जन मिरवणुकीवर राहणार ड्रोन कॅमेऱ्याची नजर!
ईद मिलाद, श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस फोर्स तैनात

महा पोलीस न्यूज । दि.१६ सप्टेंबर २०२४ । रावेर येथे गेल्या दहा दिवसांपासून अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात श्री गणेश उत्सव शांततेत पार पडला. उद्या होणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस विभागामार्फत रावेर शहरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण मिरवणुकीवर ड्रोन कॅमेऱ्याचे लक्ष असणार आहे.
रावेर शहर ५१ व रावेर पोलीस हद्दीतील गावात सुमारे ३६१ गणेश मंडळांनी श्रीगणेशाची स्थापना केली आहे. रावेर शहरातील मानाचा गणपती दुपारी १ वाजता महाआरती होऊन श्री गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरवात होणार असून रात्री १० वाजेपर्यंत श्री गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता होणार आहे. श्री गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी सर्व मंडळाची जय्यत तयारी केली असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते घेणार आहेत.
शहरातून श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचा शिस्तबद्ध आराखडा तयार करण्यात आला असल्याचे रावेर शहर सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी सांगितले. रावेर शहरातून प्रमुख मार्गाने पारंपरिक वाद्य लेझिम पथक, महीला झांज पथक, मिरवणुकीत सहभागी होणार आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रावेर येथे श्री गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात फैजपूर उप विभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांच्या उपस्थितीत १ आरसीपी प्लॅटून, १ एसआरपी प्लॅटून, स्टॅकिंग फोर्सचे २० जवान, ११० पोलीस व होमगार्ड, ८ पोलीस उपनिरीक्षक ८, रावेर येथील पोलीस, जळगाव मुख्यालयातील २० पोलीस कर्मचारी, एलसीबीचे ५ कर्मचारी, २ ड्रोन कॅमेरे, एक फोटोग्राफर असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यायची आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस विभाग योग्य ती कारवाई करेलच यात शंका नाही. असे रावेर पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांनी सांगितले आहे.