महा पोलीस न्यूज | १४ मे २०२४ | जळगाव शहरात टीबी रोग संदर्भातील एका बैठकीसाठी मुंबईहून आलेले डॉक्टर हर्षद भाऊराव लांडे वय – ४३ यांना एका भरधाव चारचाकीने उडवल्याची घटना बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास हॉटेल रॉयल पॅलेस समोर घडली होती. अपघातानंतर पळ काढलेल्या कार चालकाला रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, डॉक्टरला उडविणाऱ्याला अटक झाली मात्र रामदेववाडी येथील चौघांना चिरडणारे अद्याप मोकाट असल्याने संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्ल्ड हेल्थ ऑर्गायझेशनचे डॉक्टर हर्षद भाऊराव लांडे वय – ४३ हे बुधवारी जळगावात एका बैठकीसाठी पुण्याहून आले होते. नवीन बसस्थानकजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये ते मुक्कामी थांबले होते. रात्री हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये थांबलेल्या डॉक्टर मित्राला भेटण्यासाठी ते आले होते. मित्राला भेटून बाहेर पडल्यावर ते पायी फिरण्यासाठी काव्य रत्नावली चौकाकडे जात होते. तेव्हा त्यांचा कार चालक बाहेरच कारमध्ये बसून होता.
रात्री १२ वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना काव्य रत्नावली चौकाकडून येणाऱ्या भरधाव कारने त्यांना जोरात धडक दिली. धडकेत लांबवर फेकले गेल्याने डॉ.हर्षद यांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालयात त्यांना दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास हवालदार इरफान मलिक करीत होते.
घटनेनंतर कार चालकाने पळ काढला होता. रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारचा शोध घेतला. पोलीस तपासात धडक देणाऱ्या कारचा क्रमांक एमएच.१९.ईजी.१६६९ असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कारचालक आशीष रविंद्र देशपांडे वय-३५ धंदा- सिव्हिल इंजिनीयर, रा.दांडेकर नगर याला अटक करुन न्यायालयात हजर केले. न्या.कोलते यांच्या न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
दरम्यान, पोलिसांनी अपघातातील कार जप्त केली असून पुढील तपास हवालदार इरफान मलिक करीत आहे. जळगाव शहरात घडलेल्या अपघातातील एकाला अटक करण्यात रामानंद नगर पोलिसांना यश आले. एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत रामदेव वाडी येथे झालेल्या अपघातातील संशयित अद्याप मोकाट आहे. वाहनात चौघे असल्याची ओरड होत असली तरी चालक मात्र समोर आलेला नाही, हे मोठे आश्चर्य आहे.