राष्ट्रवादी काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हा सरचिटणीसपदी विवेक ठाकरे यांची नियुक्ती

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । ग्रामगौरव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय असणारे विवेक ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रावेर लोकसभा जिल्हा सरचिटणीस पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
विवेक ठाकरे यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी पक्षाच्या मुंबई येथील बैठकीत मंगळवार, ४ नोव्हेंबर रोजी प्रदान करण्यात आले. पक्षाचे उत्तर महाराष्ट्र विभागप्रमुख व माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते त्यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले.
या नियुक्तीपत्रात नमूद केल्यानुसार, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजित पवार आणि प्रांताध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या ध्येयधोरणांनुसार, ठाकरे यांच्यावर ओबीसी, बारा बलुतेदार आणि बहुजन समाजाला राष्ट्रवादी पक्षाच्या छत्राखाली आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना रावेर लोकसभा मतदारसंघात, विशेषत: ग्रामीण भागात, पक्षाची शिव, शाहू, फुले, आंबेडकर ही पुरोगामी विचारधारा अधिक लोकांपर्यंत पोहोचवून पक्ष संघटना मजबूत करण्याचे आणि आगामी निवडणुकीसाठी प्रचार-प्रसाराची धुरा सांभाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या सोहळ्याला माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, प्रदेश प्रवक्त्या प्रतिभा शिंदे, पक्षाचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, यावल येथील ज्येष्ठ नेते भगतसिंग पाटील, फैजपूरचे माजी उपनगराध्यक्ष कुर्बान शेख, उद्योजक हारून शेठ, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील, मुक्ताईनगरचे माजी उपनगराध्यक्ष आसिफ बागवान, युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, रावेर तालुकाध्यक्ष योगेश पाटील आणि रावेरचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विवेक ठाकरे यांनी यापूर्वी रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक या मोठ्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद भूषवले आहे, त्यामुळे त्यांच्या नियुक्तीबद्दल पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन आणि स्वागत होत आहे.






