Detection

Detection Story : ६ महिने मागोवा, ना मोबाईल, ना घर, ३ रात्र जागवून पकडला.. उगवत्या भुरट्यांचा आयकॉन

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । आजकाल मोबाईलचा जमाना असून मोबाईलमुळेच आपण पकडले जाऊ अशी भीती बहुतांश गुन्हेगारांना असते. चोरटे देखील आता स्मार्ट झाले असून पोलीस त्यांच्या एक पाऊल पुढे आहेत. दुकानफोडीच्या एका गुन्ह्यात वर्षभरापासून फरार असलेल्या एका चोरट्याला टीम एलसीबीने शिताफीने अटक केली आहे. सहा महिने मागोवा घेत सलग ३ रात्र जागवून पथकाने गावाजवळून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी पकडलेला चोरटा परिसरातील काही भुरट्या चोरट्यांचा आयकॉन असल्याने त्याची कुणीच माहिती देण्यास तयार नव्हते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडोल शहरात घडलेल्या एका चोरीतील संशयीत प्रविण रविंद्र बागुल वय २० वर्षे रा. केवडीपुरा ता.एरंडोल जि.जळगाव याला एलसीबीच्या पथकाने पकडून त्याच्याकडून १ गावठी कट्टा आणि चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

एलसीबीचे पथक ६ महिन्यापासून मागावर
एरंडोल शहरात गेल्या वर्षी घडलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्यातील एक संशयित प्रविण रविंद्र बागुल वय २० वर्षे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. संशयीत चोरटा स्मार्ट असल्याने स्थानिक पोलिसांच्या तो हाती लागत नव्हता. एलसीबीच्या पथकातील नंदलाल पाटील आणि भगवान पाटील हे ६ महिन्यांपासून त्याच्या मागावर होते. तो एकाच ठिकाणी कायम नसल्याने मिळून येत नव्हता.

पाणीपुरी खाऊन दिवस काढले, तीन रात्र जागवत शोध घेतला
एरंडोल शहरात एक इसम हा कमरेला पिस्टल लावुन चोरीच्या मोटारसायकलवर एरंडोल शहरात फिरुन दहशत करीत असल्याची माहिती टीम एलसीबीला मिळाली होती. त्यांनी लागलीच याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना कळवले. त्यांनी पथक रवाना केले असता तो इसम प्रविण रविंद्र बागुल असल्याचे निष्पन्न झाले. गावात कुणीही माहिती देत नसल्याने पथक सलग तीन दिवस त्याचा शोध घेत होते. दिवसा पाणीपुरी खाऊन त्यांनी तपास सुरु ठेवला तर रात्री, पहाटे कुठेतरी आडोशाला लपून त्याच्यावर लक्ष ठेवले.

माहिती मिळताच अचूक वेळी रस्त्यावरच हेरले
तीन दिवसांची मेहनत फळाला आली. प्रविण बागुल हा दुचाकीवर शौचास गावाच्या बाहेर नदीवर गेल्याची माहिती पथकाला मिळाली होती. पथकाने लागलीच सापळा रचला आणि प्रवीण गावाकडे येत असतानाच त्याच्या मुसक्या आवळल्या. पथकाने त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि चोरीची दुचाकी हस्तगत केली. त्याच्याविरुध्द एरंडोल पो.स्टे. ला भारतीय हत्यार अधिनियम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यूट्यूबवर शिकला चोरी, नातेवाईकांच्या घरी मुक्काम
पोलिसांनी अटक केलेला प्रवीण बागुल हा गुन्ह्यात तरबेज आणि तेवढाच चलाख आहे. पोलिसांना मोबाईल लोकेशन मिळू नये म्हणून तो स्वतःचा मोबाईल वापरत नाही. परिसरात सर्वच नातेवाईक असल्याने तो स्वतःच्या घरी झोपत नव्हता. दिवसभर घरात झोप आणि रात्री बाहेर असा त्याचा क्रम होता. अंघोळ नदीवर तर जेवण आणि पार्टी बाहेरून पार्सल घेऊन शेतात होत होती. इतकंच काय तर दुचाकी चोरीचे प्रशिक्षण त्याने यूट्यूबवर घेतले होते. विशेष म्हणजे काही भुरटे चोर त्याला आयकॉन मानत असल्याने कुणीही त्याची माहिती पोलिसांना देत नव्हते.

पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोउनि राहुल तायडे, पोउनि गणेश वाघमारे, पोउनि दत्तात्रय पोटे. पोह नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल बैसाने, राहुल कोळी, रवि कापडणे व चालक पोकॉ महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button