Crime

Breaking : पोलिसांना चहाची तल्लफ नडली, आरोपींनी गाडीतून उडी मारली

अमळनेर–नंदुरबार दरम्यान पोलीसांच्या ताब्यातून दोन संशयित आरोपी फरार

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । अमळनेर पोलीस ठाण्यातील मोटारसायकल चोरी प्रकरणातील दोन संशयित आरोपी पोलीसांच्या ताब्यातून पळून गेल्याची धक्कादायक घटना आज दि.१५ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. जळगाव कारागृहात जागा नसल्याने त्यांना नंदुरबार कारागृहात हलवताना दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात शहरात तालुक्यातील सातपिंपरी येथील अंबालाल भूरट्या खरर्डे व हिम्मत उर्फ रेहज्या पावरा या दोघांना अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तब्बल २४ मोटारसायकली जप्त केल्या होत्या. पोलिस कोठडीनंतर दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

चहाचा घोट भोवणार 
जळगाव कारागृहात जागा उपलब्ध नसल्याने दोन्ही आरोपींना शासकीय वाहनाने नंदुरबार कारागृहाकडे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. अमळनेर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी आरोपींसह नंदुरबारकडे निघाले होते. दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या हद्दीत, धावडे गावाजवळील नयन हॉटेलसमोर चहा–पाण्यासाठी वाहन थांबवण्यात आले. याचवेळी दोन्ही आरोपी संधी साधून पोलिसांना चकवा देत पळून गेले. ही घटना दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान घडल्याचे समजते.

घटनेनंतर पोलीस अलर्ट
घटना कळताच दोंडाईचा, अमळनेर, धुळे व नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरात नाकाबंदी करून शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र रात्री उशिरापर्यंत आरोपींचा माग काढता आला नव्हता. या प्रकरणामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पुढील कारवाई काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पहा संपूर्ण व्हिडिओ :

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button