भाडेकरूंची माहिती न दिल्याने घरमालकावर गुन्हा दाखल

गोळीबाराच्या घटनेनंतर रामानंद नगर पोलिसांची कारवाई
जळगाव : मध्यरात्री गोळीबाराची घटना घडलेल्या घराच्या मालकावर भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरमालक दवेंद्र भिमराव शेळके (रा. कोल्हे नगर) यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली आहे.
जळगावमधील शिवकॉलनी परिसरात राजदीप राजू सपकाळे राहत असलेल्या घरात बुधवारी (६ ऑगस्ट) मध्यरात्री गोळी झाडण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. गोळीबार प्रकरणी दीपक लक्ष्मण तरडे (रा. रामेश्वर कॉलनी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत असे समोर आले की, राजदीप सपकाळे हे ज्या घरात राहत होते, ते घर त्यांनी देवेंद्र शेळके यांच्याकडून भाड्याने घेतले होते. मात्र, घरमालक देवेंद्र शेळके यांनी भाडेकरूची माहिती स्थानिक पोलीस ठाणे किंवा महापालिकेला दिली नव्हती. त्यामुळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल चौधरी यांच्या फिर्यादीवरून देवेंद्र शेळके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






