
चाळीसगाव भूषण शेटे I – दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या ‘उदयपूर फाईल’ या वादग्रस्त चित्रपटाविरोधात अल्पसंख्यांक विकास मंडळ, जळगाव जिल्हा यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. चित्रपटातील कथानक, संवाद व दृश्यांमुळे मुस्लिम समाज, उलेमा व इस्लाम धर्माची बदनामी होत असून धार्मिक सलोखा धोक्यात येऊ शकतो, अशी तीव्र भूमिका निवेदनात मांडण्यात आली.
ही मागणी १० जुलै २०२५ रोजी चाळीसगाव उपविभागीय कार्यालयात करण्यात आली. उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील आणि नायब तहसीलदार डॉ. संदेश निकुंभ यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हे निवेदन सुपूर्द करण्यात आले.
राज्यभरात बंदीची मागणी
‘उदयपूर फाईल’ या चित्रपटात मुस्लिम समाजाबाबत चुकीची मांडणी व आक्षेपार्ह संवाद दाखवण्यात आल्याचा आरोप मंडळाने केला आहे. यामुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असून, राज्यात शांतता व जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी या चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी निवेदनात करण्यात आली
या वेळी जिल्हाध्यक्ष मुराद पटेल, तालुका अध्यक्ष सय्यद सलीम, जिल्हा उपाध्यक्ष वसीम शेख (मास्टर), सलमान खान, नासिर शेख, फिरोज खान, सय्यद जावेद, वसीम अत्तार, इम्रान खान, शेख अकील, शेख रफिक, शेख नबी, अस्लम पिंजारी यांच्यासह अनेक मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.
“राज्यातील शांतता, धार्मिक सहिष्णुता आणि अल्पसंख्यांक समाजाच्या भावना अबाधित राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.