थरारक.. पती-पत्नी जेवण करत असताना घरावर गोळीबार, दगडफेक!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । कुरियरचे काम करणारे चंद्रशेखर त्र्यंबक पाटील (वय ५५, रा. गणपती नगर, कुसुंबा) यांच्या घरावर शनिवारी (तारीख उपलब्ध नाही) रात्री १०:३० वाजता ८ ते १० अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत अचानक गोळीबार व दगडफेक केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जेवण करत असलेल्या पाटील कुटुंबाला यामुळे मोठा धक्का बसला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर पाटील हे त्यांची पत्नी यांच्यासोबत रात्री १०:३० वाजता घरी जेवण करत होते. त्यांचा एक मुलगा सुप्रीम कंपनीत कामाला गेला होता, तर दुसरा मुलगा सकाळपासून बाहेरगावी गेला होता. याच वेळी, ८ ते १० हल्लेखोर दुचाकीवरून त्यांच्या घरासमोर आले आणि त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर, त्यांनी अचानक घरावर जोरदार दगडफेक केली आणि घराबाहेर उभी असलेली दुचाकीची तोडफोड केली. या हल्लेखोरांनी त्यानंतर घराच्या दिशेने गोळीबार करत ३ राउंड फायर केले. घराबाहेर २ रिकामी पुंगळी आणि घरामध्ये १ पुंगळी पोलिसांना मिळाली आहे. हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, एमआयडीसी पोलीस ठाणे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह फॉरेन्सिक पथक आणि मोठा पोलीस कर्मचारी वर्ग घटनास्थळी तातडीने दाखल झाला. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत.






