
ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता
जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
जळगाव (प्रतिनिधी) : ज्येष्ठ विधिज्ञ आणि देशपातळीवर अनेक गाजलेल्या खटल्यांचे सरकारी वकील म्हणून ओळखले जाणारे ॲड. उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे आता जळगाव जिल्ह्याचे तीन प्रतिनिधी संसदेत सहभागी होणार असून, निकम यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे रावेरच्या खासदार रक्षा खडसे या आधीच केंद्रात राज्यमंत्री असताना, आता निकम यांनाही मंत्रीपद दिले जाण्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
कायदेविषयक पार्श्वभूमी लाभलेल्या निकम यांनी आपल्या वडील बॅरिस्टर निकम यांच्याकडून मिळालेला वकिलीचा वारसा समर्थपणे पुढे नेत अनेक गंभीर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये यशस्वी भूमिका बजावली आहे. यामध्ये अजमल कसाब खटला, २६/११ मुंबई हल्ला, प्रसिद्ध बलात्कार प्रकरणे अशा अनेक प्रकरणांचा समावेश आहे. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना राजकारणात येण्यासाठी गळ घालण्यात आली होती, मात्र त्यांनी ती संधी नाकारली होती.
भाजपने मात्र त्यांना आपल्या पक्षात स्थान देत, मागील लोकसभा निवडणुकीत उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. निवडणुकीत यश न मिळाल्यानंतरही पक्षाने त्यांच्या अनुभवाची दखल घेत त्यांना राज्यसभेत संधी दिली. त्यांच्या कायद्याविषयक जाणकार दृष्टिकोनामुळे संसदीय चर्चेत गुणवत्ता येईल, असा सरकारचा हेतू असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, निकम यांच्या मंत्रिपदाच्या शक्यतेवर भाजप नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “निकम यांच्यासारख्या व्यक्तीला राज्यसभेत पाठवताना काही निश्चित विचार केला गेला आहे. त्यांच्या मंत्रिपदाच्या चर्चेमध्ये काही तथ्य आहे,” असे महाजन यांनी म्हटले आहे.
जर निकम यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले, तर जळगाव जिल्ह्याचे दोन खासदार केंद्र सरकारमध्ये मंत्रीपदी असतील, तर राज्यात मंत्रीगिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि आ. चंद्रकांत पाटील यांच्यासह एकूण पाच मंत्री जळगाव जिल्ह्यातून असतील. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय ताकदीत मोठी भर पडणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.