जळगाव शहरात कुणाच्या आशिर्वादाने सुरू आहेत ‘स्पा सेंटर’
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गैरप्रकारांना ऊत, हफ्तेखोरीची चर्चा, कारवाई कधी?

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । शहरात दिवसेंदिवस अनधिकृतपणे सुरू असलेल्या स्पा सेंटरची संख्या वाढत असून, या ठिकाणी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन विविध गैरप्रकार सुरू असल्याच्या चर्चा होत आहेत. विशेष म्हणजे, स्थानिक पोलीस, महापालिका, जिल्हा प्रशासन, कामगार विभाग, आरोग्य विभागाकडून या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. जळगावात एकही स्पा सेंटरवर कारवाई झाल्याचे अद्याप समोर आलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहरातील अनेक प्रमुख भागांत स्पा आणि मसाज सेंटर सुरू आहेत. सुरुवातीला २-३ असलेल्या स्पा सेंटरची संख्या आज ८ च्या पुढे गेली असून त्यात भर पडतच आहे. काही ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक कृत्ये चालू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा होऊनही प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने या व्यवसायांना अभय मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाढते धाडस
जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलिसांकडून या स्पा सेंटरची तपासणी होत नाही त्यामुळे सर्वांचे फावले होत आहे. स्पा सेंटरवर कारवाई करण्याऐवजी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. काही सेंटरमालक प्रशासनातीलच काही कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या आश्रयाने हा अनधिकृत व्यवसाय चालवत असल्याचे बोलले जात आहे.
सोशल मीडियातून जाहिरात, मध्यवर्ती भागात सेंटर
जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात, गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ, रिंगरोड परिसर, रामानंदनगर, मेहरुण उद्यान परिसरात स्पा सेंटर मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. विशेष म्हणजे स्पा सेंटरची माहिती देणारे आकर्षक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केले जात असून विविध ऑफर देत ग्राहकांना आकर्षित केले जाते.
बी-टू-बी, हँड सर्व्हिसच्या नावाने गैरप्रकार
शहरात सुरू असलेल्या स्पा सेंटरमध्ये विविध प्रकारच्या मसाज सेवा पुरवल्या जातात. प्रत्येक मसाजचे दर वेगवेगळे आहेत. काही डोस सेंटरमध्ये सेवेचा दर दिल्यानंतर खोलीत मसाज करताना संबंधित तरुणीकडून वेगळ्याच सेवेचे आमिष दाखवले जाते. बी-टू-बी, हँड सर्व्हिसच्या नावाने गैरप्रकार देखील केले जातात. संबंधित स्पा मालकांना देखील याबाबत कल्पना असते.
नागरिकांमध्ये संताप, कारवाईची मागणी
शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जिल्हा प्रशासनाने संयुक्त तपासणी करून अनधिकृत स्पा सेंटरवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच, जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर सामाजिक संघटनाकडून भविष्यात आंदोलन देखील पुकारले जाऊ शकते.
स्पा सेंटरमध्ये अतिरिक्त शारीरिक सेवा
जळगाव शहरातील जवळपास सर्वच स्पा सेंटरमध्ये मी मसाज केला आहे. मसाज सेवा देणाऱ्या बहुतांश तरुणी परप्रांतीय आहेत. काही ठिकाणी मसाज करताना साधारणतः २० मिनिटांनी तुम्हाला इतर अतिरिक्त सेवेची माहिती देण्यात येते. तुम्ही अगोदर दिलेल्या रकमेव्यतिरिक्त हे पैसे वेगळे द्यावे लागतात. सुरूवातीला मला कळले नाही मात्र नंतर त्या तरुणीने सविस्तर सांगितले, अशी माहिती राज (नाव बदललेले) या ग्राहकाने सांगितले.