
अनैतिक संबंधातून युवकाची निर्घृण हत्या
वणी पोलिसांची अवघ्या काही तासांत गुन्ह्याची उकल; दोघांना अटक
वणी (प्रतिनिधी): वणी शहर हादरवून सोडणाऱ्या एका थरारक हत्येच्या प्रकरणाचा छडा वणी पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावला आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे तपासात स्पष्ट झाले असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या तात्काळ आणि प्रभावी कारवाईबद्दल वणी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दि. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता स्वप्नील किशोर राऊत (वय २६, रा. रंगनाथनगर, वणी, जि. यवतमाळ) या युवकाला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. ठेकेदाराकडून पैसे आणायचे असल्याचे सांगून तो घरातून बाहेर पडला. सायंकाळी सहा वाजता पत्नीशी शेवटचा संपर्क झाल्यानंतर त्याचा फोन बंद झाला आणि तो घरी परतला नाही.
पुढील दिवशी सकाळपासून कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला असता, सायंकाळी गजानन नगरी, वडगाव टीप रोड परिसरात एका अज्ञात मृतदेहाचा फोटो मिळाला. फोटो पाहिल्यानंतर मृतदेह स्वप्नील राऊतचाच असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या भावाने चेतन किशोर राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, स्वप्नीलचा मृतदेह गळा व डोक्यावर गंभीर जखमांसह रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. धारदार शस्त्र व दगडाने निर्दयपणे मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली होती.
पोलिसांची तत्पर कारवाई
या फिर्यादीवरून वणी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६८२/२०२५ भा.न्या.सं. कलम १०३ (१)(BNS) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO), वणी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक श्री. गोपाल उंबरकर यांच्या नेतृत्वात वणी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा (LCB) यांनी संयुक्त तपास मोहीम सुरू केली.
तपास पथकात पोउपनि सुदाम आसोरे, तसेच अंमलदार श्याम, नंदकुमार, मानेश्वर, गजानन, गणेश (वणी पोलिस स्टेशन) आणि सपोनी दत्ता पेंडकर, हे.कॉ. सुधीर पांडे, पो.कॉ. सलमान शेख, पो.कॉ. रजनीकांत मडावी (LCB पथक, वणी) यांचा समावेश होता.
शेवटच्या हालचालींचा मागोवा घेताना, पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्वप्नील हा दुपारी ४:३५ वाजता दोन व्यक्तींसोबत लाल रंगाच्या पॅशन प्रो (MH 34 Z 5813) या दुचाकीवर ब्राम्हणी फाटा चौकातून जाताना दिसला. दुचाकीच्या मालकाचा शोध घेतल्यावर संशयितांचा माग काढण्यात यश आले.
आरोपींना अटक आणि हत्येचे कारण उघड:
तपासात पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, सुमेश रमेश टेकाम (वय २४, रा. वडजापूर, ता. वणी, जि. यवतमाळ सौरभ मारोती आत्रम (वय २७, रा. वडजापूर, ता. वणी, जि. यवतमाळ) अशी या दोन संशयित आरोपींची नावे आहेत.
चौकशीत दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, अनैतिक संबंधातून झालेल्या वादातूनच ही हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि सुदाम आसोरे (पोलीस स्टेशन वणी) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.






