३५ वर्षे न थकता कर्तव्यावर! दबंग पीएसआय संजय शेलार यांना राष्ट्रपती पोलीस पदक

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक संजय एकनाथ शेलार यांना सन २०२६ चे प्रतिष्ठित ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. तब्बल ३५ वर्षांच्या निष्ठावान, प्रामाणिक आणि निष्कलंक सेवेला मिळालेली ही राष्ट्रीय पातळीवरील पावती मानली जात आहे.
पोलीस दलातील शिस्त, सचोटी आणि समर्पणाचे चालते-बोलते उदाहरण म्हणून संजय शेलार यांची ओळख आहे. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी अखंडपणे ३५ वर्षे कर्तव्य बजावले असून, उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना आजवर २४२ बक्षिसांनी गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण सेवाकाळात त्यांच्यावर एकदाही शिक्षा, दंड किंवा ताकीद झाली नाही. त्यांचा सर्व्हिस रेकॉर्ड पूर्णपणे स्वच्छ, निर्दोष आणि अनुकरणीय राहिला आहे.
कर्तव्यनिष्ठेचा आणखी एक उल्लेखनीय पैलू म्हणजे, ३५ वर्षांच्या सेवेत त्यांनी कधीही आजारपणाची रजा घेतलेली नाही. कठोर शिस्त, कामाप्रती असलेली निष्ठा आणि जबाबदारीची ठाम जाणीव यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व अधोरेखित होते.
या उल्लेखनीय सेवेची दखल घेत भारत सरकारने प्रजासत्ताक दिन २०२६ च्या पार्श्वभूमीवर त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. या गौरवामुळे संपूर्ण जळगाव जिल्हा पोलीस दलात आनंदाचे वातावरण पसरले असून, वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी तसेच नागरिकांकडून संजय शेलार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ही कामगिरी केवळ एका अधिकाऱ्याचा सन्मान नसून, कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव यांचा विजय असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.





