पाचोरा विषबाधेमुळे ६ म्हशी व १ रेडा मृत्युमुखी पडल्याची घटना तालुक्यातील खडक देवळा येथे घडली या दुर्दैवी घटनेत तालुक्यातील खडकदेवळा येथे शेतकऱ्याचे सुमारे ७ लाखांचे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पशूवैद्यकिय पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून मृत्युमुखी पडलेल्या गुरांचे जागेवरच शवविच्छेदन केले.
दरम्यान, खडकदेवळा खुर्द येथील रहिवासी राजू हरचंद परदेशी यांच्या मालकीच्या ६ म्हशी व रेडा यांना ३ डिसेंबर रोजी हे त्यांच्या घराजवळ असलेल्या २०० लिटर प्लास्टिकच्या बॅरलमधून पाणी पाजले. हे पाणी प्यायल्यानंतर ६ म्हशी व एक रेडा यांचा थरकाप होवून ते सर्व जमिनीवर कोसळले.
दरम्यान, सुदाम वाघ, पोलिस पाटील तुकाराम तेली, बापू पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तत्काळ पशूधन विस्तार अधिकाऱ्यांना घटनेबाबत माहिती दिली. यानंतर पशूधन विस्तार अधिकारी डॉ. सुजाता सावंत, डॉ. पंचलिंगे (बाबंरुड राणीचे), डॉ. दौंड (पिंपळगाव हरेश्वर), डॉ. बाविस्कर (पिंपळगाव हरेश्वर), डॉ. बोरसे (वरखेडी), डॉ. गिरिश माळी (गाळण), डॉ. शंकर मडावी (सातगाव डोंगरी), डॉ. हेमंत नागणे (लोहटार) यांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गुरांची पाहणी केली. या घटनेत ६ म्हशी तर एका रेड्याचा मृत्यू झाला. पथकाने मयत झालेल्या गुरांचे जागेवर शवविच्छेदन केले. तर हे नमुने तपासणीसाठी पाठवणार असल्याचे पशूधन विस्तार अधिकारी डॉ. सुजाता सावंत यांनी सांगितले.