पिंप्राळ्याचा गड कोण राखणार, कुलभूषण पाटील की मयूर कापसे?
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वच उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून तब्बल २९ उमेदवार रिंगणात असून त्यात दोन बंडखोर मातब्बर उमेदवार पिंप्राळा परिसरातील आहेत. पिंप्राळा परिसर मोठा असून त्याठिकाणी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील की माजी नगरसेवक मयूर कापसे हे गड राखणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीत माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले असून जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यात भाजपचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, माजी नगरसेवक मयूर कापसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील हे तिघे मोठा चेहरा आहेत. जळगावकरांची आणि समाजातील मते पारड्यात पाडून घेण्याची तिघांची क्षमता असल्याने त्यांची उमेदवारी निर्णायक मानली जात आहे.
पिंप्राळा परिसरातील दोघे दिग्गज
जळगाव मनपा निवडणुकीत पिंप्राळा परिसरातून कुलभूषण पाटील आणि मयूर कापसे दोघे भाजपकडून मैदानात उतरले होते. दोघांनी दमदार विजय संपादित केला. अडीच वर्षांनी मयूर कापसे यांच्या मातोश्री प्रतिभा कापसे या महापौर पदाच्या दावेदार होत्या मात्र भाजपला खिंडार पडली आणि अनेक नगरसेवक शिवसेनेत सामील झाले. महापौर पदाची मॅजिक फिगर बंडखोरांच्या ताब्यात असल्याने शिवसेनेच्या जयश्री महाजन महापौर झाल्या तर बंडखोर नगरसेवक कुलभूषण पाटील हे उपमहापौर झाले.
कुणाला मिळणार बहुमत
पूर्वी भाजपत मात्र सध्या वेगवेगळ्या पक्षात असलेले दोघे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कुलभूषण पाटील आणि मयूर कापसे दोघे मराठा समाजाचा तरुण चेहरा असून पिंप्राळा परिसरातील आहे. दोघांनाही जळगावकर ओळखून असून पिंप्राळा भागावर त्यांची अधिक मदार असणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर जळगाव मनपा असल्याने ते पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. पक्षांतर आणि बंडखोरीनंतर पिंप्राळा परिसरात कुणाची हवा चालणार हे vidhansabha निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.