महिलेच्या ताब्यातून अवैध देशी पिस्तूल जप्त – यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

महिलेच्या ताब्यातून अवैध देशी पिस्तूल जप्त ;यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
यवतमाळ प्रतिनिधी
यवतमाळ ग्रामीण हद्दीत अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून, तिच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 10 मार्च 2025 रोजी केली.
यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस गस्त घालत असताना एका महिलेच्या ताब्यात अवैध शस्त्र असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.
माहितीनुसार, एक महिला पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिव्हा (क्रमांक MH 29 Z 7565) वरून गाळम्हसोला गावाकडून यवतमाळकडे येत होती. तिच्या वाहनाच्या डिक्कीत देशी बनावटीचे पिस्तूल असल्याचा संशय होता.
त्यानुसार, देवस्थानाजवळ पोलिसांनी सापळा रचला. काही वेळाने एक महिला संशयित दुचाकीवरून येताना दिसली. महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने तिला अडवण्यात आले आणि तिची झडती घेण्यात आली.
झडतीत पिस्तूल आणि जिवंत काडतुसे सापडली
महिलेच्या वाहनाची झडती घेतली असता डिक्कीत एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि 21 जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी महिलेने शस्त्र बाळगण्याचा परवाना विचारला असता, तिच्याकडे कोणतेही अधिकृत दस्तऐवज नसल्याचे स्पष्ट झाले.
गुन्ह्याची पार्श्वभूमी
महिलेची चौकशी केली असता तिने सांगितले की, 2018-19 मध्ये तिची ओळख विनय राठोड नामक व्यक्तीसोबत झाली होती. त्यांच्यात मैत्री झाल्यानंतर त्यानेच हे पिस्तूल तिला दिले होते. काही दिवसांनी विनय राठोडचा खून झाला, आणि त्यानंतर ती हे पिस्तूल स्वतःजवळच बाळगून होती.
पोलिसांनी महिलेला अटक करून तिच्या ताब्यातील 1 देशी पिस्तूल, 21 जिवंत काडतुसे आणि अॅक्टिव्हा दुचाकी असा एकूण 1,01,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाहीसाठी तिला न्यायालयात हजर करण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पथकाची यशस्वी कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू, पोलीस अंमलदार सै. साजिद, बंडू डांगे, रुपेश पालो, योगेश डगवार, प्रशांत हेडाऊ, आकाश सहारे, आकाश सूर्यवंशी, देवेंद्र होले, सरोज रोडगे, ममता देवतळे आणि योगेश टेकाम यांनी सहभाग घेतला.