
यवतमाळ जिल्हा पोलीस विभागात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
महिला पोलीस अधिकारी व अंमलदारांचा गौरव; विविध मार्गदर्शन सत्रांचे आयोजन
यवतमाळ (प्रतिनिधी): यवतमाळ जिल्हा पोलीस विभागातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आरोग्य, कायदेविषयक आणि शैक्षणिक मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. तसेच, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला पोलिसांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन
महिला पोलिसांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध डॉक्टर डॉ. वृषाली गिरीश माने मॅडम, कायदेविषयक मार्गदर्शनासाठी ऍड. सीमा तेलंगे, तसेच शैक्षणिक मार्गदर्शनासाठी IAS अधिकारी लघीमा तिवारी (SDM, महागाव) यांना आमंत्रित करण्यात आले होते. या मान्यवरांनी महिला पोलिसांना त्यांच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण माहिती दिली व प्रेरणादायी संवाद साधला.
महिला पोलिसांचा गौरव व सन्मान
यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत महिला पोलिस अधिकारी आणि महिला पोलिस अंमलदार यांनी उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल त्यांचा पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब व प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या अथक परिश्रमांची दखल घेत या कार्यक्रमात त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
पोलीस अधीक्षकांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक कुमार चिंता होते. त्यांनी सर्व महिला पोलिस अधिकारी व अंमलदारांना प्रत्यक्ष फील्डवर सक्षमपणे कार्य करण्यासाठी प्रेरित केले व शुभेच्छा दिल्या. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे यांनीही महिला पोलिसांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या विशेष कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्यातील सर्व महिला पोलिस अधिकारी व महिला पोलिस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक श्रीमती सुशीला पवार आणि कार्यालयीन महिला कर्मचारी देखील उपस्थित होत्या.
सुत्रसंचालन व कार्यक्रमाचे आयोजन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी गुल्हाने (जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, यवतमाळ) यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले.
हा कार्यक्रम मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. यासाठी पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर (प्रभारी पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन लोहारा), पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी अजित राठोड व त्यांची टीम, तसेच पोलीस निरीक्षक ज्ञानदेव देवकते (जिल्हा वाहतूक शाखा) व त्यांची टीम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलिमा सातव (भरोसा सेल) यांनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
महिला पोलिसांसाठी प्रेरणादायी उपक्रम
या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला पोलिसांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला. महिलांना सक्षम करण्यासाठी पोलीस विभाग नेहमीच पुढे असून अशा उपक्रमांमधून त्यांना अधिक प्रेरणा मिळत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.