कुख्यात गुन्हेगारांनी दरोड्याचा प्लॅन रचला ; पोलिसांनीच तो उधळून लावला !
घातक शस्त्रांसह सात कुख्यात गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या ; चोपडा शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

कुख्यात गुन्हेगारांनी दरोड्याचा प्लॅन रचला ; पोलिसांनीच तो उधळून लावला !
घातक शस्त्रांसह सात कुख्यात गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या ; चोपडा शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
चोपडा प्रतिनिधी चोपडा शहर पोलिसांनी गेल्या रात्री एक मोठी यशस्वी कारवाई करून दरोडा टाकण्याची प्लॅन करणाऱ्या सात कुख्यात गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, तलवारी व चारचाकी वाहन यांसह एकूण साडेतेरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मध्यरात्री सुमारे २:३० वाजता शिरपूर बायपास रोडवरील रणगाडा चौकाजवळ एक संशयास्पद पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार (MH-26 CH-1733) उभी असल्याचे समजल्यावर, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांना पाहून पळू पाहणाऱ्या सातही संशयितांना पोलिसांनी चतुराईने वेढा घालून धरपकड केली.
मुद्देमाल जप्त
संशयितांकडून झडती घेतल्यावर दोन लोड केलेली गावठी पिस्तुले, एक रिकामे मॅगझीन, दोन तलवारी, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि दरोड्यासाठी वापरात असलेले चारचाकी वाहन अशा एकूण १३ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये दिलीपसिंह हरिसिंह पवार (वय ३२, राहणार नाथनगर, नांदेड),.विक्रम बाळासाहेब बोरगे (वय २४, राहणार वैजापूर, जि. संभाजीनगर) ,अनिकेत बालाजी सूर्यवंशी (वय २५, राहणार नवामोंढा, नांदेड), अमनदीपसिंह अवतारसिंह राठोड (वय २५, राहणार मगनपूरा, नांदेड) ,सदामहुसेन मोहम्मद अमीन (वय ३३, राहणार इतवारा, नांदेड), अक्षय रविंद्र महाले (वय ३०, राहणार भावसार गल्ली, चोपडा) ,जयेश राजेंद्र महाजन (वय ३०, राहणार भाट गल्ली, चोपडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सर्व आरोपी सराईत ; गंभीर गुन्हे दाखल
अटक झालेले सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांतर्फे खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दंगल, दहशत माजवणे आणि बेकायदा शस्त्रे बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे नोंदलेले आहेत. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले आहे की, हे आरोपी शस्त्रांसह सज्ज होऊन रस्त्यावर दरोडा टाकण्याचीच रचना करत होते. याशिवाय, नांदेड परिसरात खंडणी वसुली आणि अपहरणासारखे गुन्हे करून हे आरोपी दहशत निर्माण करत असल्याचेही समोर आले आहे.
यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
चोपडा शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.






