ब्रेकींग : शनिपेठेतील तरुणाचा रेल्वेखाली मृत्यू, घातपाताची चर्चा

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील असोदा रस्त्यावर असलेल्या तानाजी मालुसरे नगरातील रहिवासी ३० वर्षीय तरुणाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. दरम्यान, तरुणाचा रात्री काही तरुणांशी वाद झाला होता आणि त्यानंतर त्याचा घातपात झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील असोदा रस्त्यावर असलेल्या तानाजी मालुसरे नगरातील रहिवासी हर्षल प्रदीप भावसार हा तरुण मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो. त्याच्या घरी आई-वडील असा परिवार आहे.
रेल्वे स्टेशन अधिकारी राजेश पालरेचा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास रेल्वे खांबा क्रमांक ४३३/१४ अ ते ४३३/१६/अ दरम्यान रेल्वेखाली आल्याने एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मालगाडी लोको पायलट यांनी दिली होती. रात्री २ वाजता ही घटना उघडकीस आली.
तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अनंत अहिरे आणि हवालदार प्रकाश चिंचोरे यांनी घटनास्थळ पंचनामा करून जिल्हा रुग्णालयात माहिती जाणून घेतली. दरम्यान, मयत तरुणाचा रात्री काही तरुणांशी वाद झाला होता आणि त्यानंतर त्याचा घातपात झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे.






