जवखेडे सिम गावात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; १५ जण ताब्यात

जवखेडे सिम गावात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; १५ जण ताब्यात
१.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त; कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
एरंडोल, ता. ६ (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील जवखेडे सिम गावातील गालापूर रोडजवळ सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर कासोदा पोलिसांनी छापा टाकत १५ जुगार्यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम आणि दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख २१ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, जवखेडे सिम गावातील गालापूर रोडला लागून असलेल्या काटेरी झुडपांच्या आडोशाला काही लोक जुगार खेळत आहेत. या माहितीच्या आधारावर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांनी तात्काळ पोलीस नाईक प्रदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल समाधान तोंडे, निलेश गायकवाड आणि योगेश पाटील यांच्या पथकाला कारवाईसाठी पाठवले.
पोलिसांनी घटनास्थळाजवळ वाहने थांबवून पायी जाऊन पाहणी केली असता, काही लोक जमिनीवर बसून पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तात्काळ जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात जुगार्यांच्या अंगझडतीतून आणि जुगाराच्या डावातून ६ हजार ३९० रुपये रोख रक्कम आणि १ लाख १५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख २१ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व १५ जणांवर पोलीस कॉन्स्टेबल दीपक देसले यांच्या फिर्यादीनुसार कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सोनू धाकु भिल, विरभान श्रावण भिल, राहुल संतोष सोनवणे, प्रवीण वसंत सोनवणे, संतोष माधव सोनवणे, सुनील दगा ठाकरे, मंगिलाल भाईदास चव्हाण, रतन धाकु भिल, अशोक गोविंदा पाटील, सचिन बापू पवार, कांतीलाल महादू सोनवणे, उत्तम बालाअप्पा जेढे, समाधान बापू पाटील, संभाजी महारु पाटील आणि सुनील सीताराम वाघ यांचा समावेश आहे. हे सर्व जवखेडे सिम गावचे रहिवासी आहेत.