Crime

लग्नाचा तगादा लावणाऱ्या महिलेचा विहीरीत ढकलून खून; आरोपीला जन्मठेप

लग्नाचा तगादा लावणाऱ्या महिलेचा विहीरीत ढकलून खून; आरोपीला जन्मठेप
भुसावळ सत्र न्यायालयाचा निकाल
जळगाव प्रतिनिधी :मुक्ताईनगर तालुक्यातील भाये शिवारातील नायगाव रोडवर घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचा लग्नाचा तगादा लागल्याने संतापलेल्या प्रियकराने तिला खोल विहीरीत ढकलून खून केल्याचा गुन्हा सिद्ध ठरला असून, आरोपी गुलाम इद्रीस गुलाम हुसेन (रा. मोमीनपुरा, वार्ड क्र. ३०, श्रीकुमार बिल्डिंग जवळ, बुरहानपूर, मध्यप्रदेश) यास भुसावळ सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, २७ मार्च २०२२ रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास नायगाव रोडवरील रविंद्र भारकर पोहेकर यांच्या गट क्र. २३०/१ मधील शेतातील विहीरीवर आरोपी गुलाम इद्रीस व मयत महिला सकाळपासून दुपारपर्यंत बसून होते. दोघांमध्ये मागील दोन वर्षांपासून अनैतिक संबंध होते व ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, मयत महिलेकडून वारंवार लग्नाचा आग्रह करण्यात येत असल्याने आरोपी त्रस्त झाला होता. याच संतापातून त्याने महिलेचा खून करण्याचा कट रचला.

त्या दिवशी आरोपीने महिलेचा हात धरून तिला विहीरीत ढकलले. विहीरीतील इलेक्ट्रिक मोटारीच्या पाईप व वायरचा वापर करून तिला बाहेर येऊ न देता, तो वायर आणि पाईप विळ्याच्या सहाय्याने कापून टाकला. त्यामुळे महिला पाण्यात बुडून मरण पावली. या घटनेची माहिती मिळताच मयत महिलेचा भाऊ शे. फरीद शे. मुसा (रा. बडनेर भोलजी, ता. नांदुरा, जि. बुलढाणा) यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रदीप शेवाळे व उपनिरीक्षक राहुल बोरकर यांनी केला. तपासादरम्यान १७ साक्षीदार तपासण्यात आले, ज्यात मयताची बहिण हसीनाबो शेख, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सुरज मराठे, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली पाटील यांचा समावेश होता. तसेच आरोपी आणि मयत महिलेचे मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), टॉवर लोकेशन आणि सिमकार्ड माहिती हे पुरावे निर्णायक ठरले.

या सर्व पुराव्यांच्या आधारे सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता मोहन देशपांडे यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत आरोपी गुलाम इद्रीस गुलाम हुसेन यास आयुष्यभराच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात पैरवी अधिकारी पोलिस शिपाई कांतीला कोळी व ज्ञानेश्वर चौधरी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

या निकालाने मुक्ताईनगर परिसरात दिलासा व्यक्त केला जात असून, महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय न्यायव्यवस्थेच्या ठाम भूमिकेचे प्रतीक ठरत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button