दोन वाहनांतून २४ बैलांची निर्दयी वाहतूक; तीन आरोपींना अटक
५० लाखांचा मुद्देमाल जप्त ; यवतमाळ पोलिसांची कारवाई

यवतमाळ महापोलीस न्यूज l 10 मे 2025 गोवंश जनावरांची कतलीसाठी अवैध वाहतूक करत असलेल्या टोळीवर यवतमाळ जिल्हा पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. यावेळी २४ गोवंश जनावरे व दोन आयशर वाहने असा एकूण ४९ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ९ एप्रिल रोजी देवधरी घाटात करण्यात आली.
पोलीस निरीक्षक भोरकडे व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, नागपूरहून हैदराबादकडे जात असलेल्या दोन आयशर वाहनांमध्ये निर्दयी पद्धतीने गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले.
पहिले वाहन MH-40-BG-7987 हे देवधरी घाटात आल्यावर थांबवण्यात आले. वाहनचालक अब्दुल सादीक जाकीर (वय २२, रा. आझाद नगर, नागपूर) आणि त्याच्या सोबत असलेला शेख आशिक फकरु कुरेशी (वय ३७, रा. महेंद्र नगर, नागपूर) यांना ताब्यात घेण्यात आले. वाहनाची झडती घेतली असता १२ बैल अत्यंत क्रूरतेने एकमेकांवर बांधून, गळ्यात दोराचे फास आवळून, पाणी-चाऱ्याची कोणतीही व्यवस्था न करता वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले.
दरम्यान, दुसरे वाहन MH-40-CT-8864 हे पोलीसांना पाहताच पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पाठलाग करत ग्राम वेडशी येथे चालक मोहम्मद जावेद खान (वय ३७, रा. कामठी, नागपूर) याला पकडण्यात आले. या वाहनातही १२ गोवंश बैल निर्दयीपणे कोंबलेले आढळून आले.
दोन्ही वाहनांत मिळून एकूण २४ बैल (सुमारे किंमत ४ लाख ८० हजार रुपये) तसेच दोन्ही आयशर वाहने (एकूण किंमत ४५ लाख रुपये) असा ४९ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम २८१, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५, ५-अ, ५-२ व प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक . कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. श्री. भोरकडे, पोहवा. विनोद नागरगोजे, पोन. सचिन नेवारे यांच्या पथकाने पार पाडली.