Crime

नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ राष्ट्रपती शौर्यचक्रप्राप्त आयपीएस सोमय मुंडे पुण्याचे नवे पोलीस उपायुक्त

नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ राष्ट्रपती शौर्यचक्रप्राप्त आयपीएस सोमय मुंडे पुण्याचे नवे पोलीस उपायुक्त

पुणे प्रतिनिधी l महापोलीस न्यूज l राष्ट्रपती शौर्यचक्रप्राप्त आयपीएस अधिकारी सोमय विनायक मुंडे यांची नुकतीच पुणे शहर पोलिस दलात उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

यापूर्वी मे 2025 मध्ये त्यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. अवघ्या एका महिन्यात त्यांची पुन्हा बदली होऊन त्यांना पुणे शहरात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी ते लातूरचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.

शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवास
मूळचे देगलूर येथील असलेले सोमय मुंडे हे केमिकल इंजिनीअर आहेत. त्यांचे आई-वडील दोघेही वैद्यकीय क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत आहेत. मुंडे यांनी साताऱ्याच्या सैनिकी शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतले,

त्यानंतर डेहराडून येथून दहावी आणि हैदराबाद येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पवई येथील आयआयटीमधून त्यांनी केमिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. 2016 मध्ये आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी वैजापूर येथे प्रोबेशनरी अधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर अमरावती येथे अपर पोलिस अधीक्षक आणि 2021 मध्ये गडचिरोली येथे नक्षलविरोधी मोहिमेचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.

गडचिरोलीतील शौर्यपूर्ण कामगिरी
गडचिरोलीतील मरदीन टोला परिसरात नक्षलवाद्यांविरुद्धच्या चकमकीत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली 26 नक्षलवादी ठार झाले. या मोहिमेत त्यांनी अपवादात्मक शौर्य दाखवले. छत्तीसगडमधील अबुजमाळ आणि गडचिरोलीतील अटापल्ली येथील नक्षलविरोधी कारवायांमध्येही त्यांनी मोलाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे, 1 कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करताना नक्षलवादी म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे, ज्याच्यावर 50 लाखांचे बक्षीस होते, त्याचाही खात्मा केला. या अतुलनीय कामगिरीसाठी 2022 मध्ये त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यचक्र प्रदान करण्यात आले.

पुण्यात नव्या जबाबदारीकडे वाटचाल
आता पुणे शहर पोलिस दलात उपायुक्त म्हणून सोमय मुंडे यांच्या नियुक्तीमुळे त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा लाभ शहराच्या कायदा व सुव्यवस्थेला होणार आहे. त्यांच्या या नव्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button