
कच्चं तेल स्वस्त, पण दरवाढ मस्त! ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा केंद्र सरकारविरोधात रस्ता रोको
जळगाव (प्रतिनिधी): कच्च्या तेलाच्या किमती ऐतिहासिक नीचांकी पातळीवर असतानाही केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे दर कमी न करता जनतेवर महागाईचा बोजा टाकल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तर्फे आज १६ एप्रिल रोजी आकाशवाणी चौकात तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष रिकू चौधरी यांनी केले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या महागाई धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
“कच्चं तेल स्वस्त, पण दरवाढ मस्त – हेच का अच्छे दिन?”,“पेट्रोलवर नफा, जनतेवर फटका , सरकारची धोरणं भटका!”,“नफा कंपन्यांना, महागाई जनतेला, हेच का ‘सबका साथ’?”,“दरवाढ रोज, नफा भरघोस , हे कुठलं धोरण?”या आणि अशा अनेक घोषणा देत आंदोलकांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ६५.४१ डॉलर इतक्या खाली आल्या असून, ही किंमत गेल्या चार वर्षांतील नीचांकी पातळीवर आहे. तरीदेखील केंद्र सरकारने इंधन दरात कोणतीही कपात केली नाही. रेटिंग एजन्सीच्या अहवालानुसार, तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर १५ ते १६ रुपये आणि डिझेलवर ६.१२ रुपये नफा मिळतो आहे.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, डॉ. संग्रामसिंह सूर्यवंशी, सुनील माळी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, माजी नगरसेवक राजू मोरे, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत, तसेच डॉ. राहुल उदासी, रहीम तडवी, आकाश हिवाळे, चेतन पवार, साहिल पटेल, रफीक पटेल, योगेश साळी, संजय चव्हाण, मयूर पाटील, आबिद खान, अरबाज पटेल यांचा समावेश होता.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केंद्र सरकारच्या असंवेदनशील धोरणांचा निषेध करत जनतेच्या हितासाठी इंधन दर कमी करण्याची मागणी केली.