
रिक्षाचलकाकडून गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त
शनिपेठ पोलिसांची कारवाई
जळगाव प्रतिनिधी शहरात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांकडून नाकाबंदी आणि गस्त वाढवण्यात आली आहे. याच मोहिमेअंतर्गत शनीपेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत एका रिक्षाचालकाकडून गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, २८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, कुसुंबा येथे राहणारा एक रिक्षाचालक MH19CW6108 क्रमांकाच्या रिक्षातून जळगावकडे येत असून, त्याच्याकडे देशी कट्टा व जिवंत काडतूसे आहेत.
त्यानुसार, शनीपेठ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नेरी नाका येथे सापळा रचला. दुपारी २ वाजता संशयित रिक्षा अडवून तपासणी केली असता, रिक्षाच्या ड्रायव्हर सीटखाली लपवून ठेवलेला लोखंडी देशी बनावटीचा कट्टा आणि त्याच्या मॅगझिनमध्ये दोन जिवंत काडतुसे आढळून आली.
या प्रकरणी आरोपी राहुल रंगराव पाटील (वय ३२, रा. कुसुंबा, साई सिटी रोड, गणपतीनगर, जळगाव) यास अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७३/२०२५ अंतर्गत भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ (१-बी)(अ), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) चे उल्लंघन १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक किरण वानखेडे, पोलीस हवालदार विकी इंगळे आणि पोलीस हवालदार रविंद्र साबळे यांनी केली. अटक आरोपीला २९ मार्च रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी करीत आहेत.