शिवसेना-धनुष्यबाण’ वादाचा निकाल ऑगस्टमध्ये शक्य; सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्टता

‘शिवसेना-धनुष्यबाण’ वादाचा निकाल ऑगस्टमध्ये शक्य; सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्टता
नवी दिल्ली (प्रतिनिधी) – ‘शिवसेना’ पक्ष आणि त्याच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावर सुरू असलेल्या वादावर येत्या ऑगस्ट महिन्यात अंतिम सुनावणी होणार असून, या खटल्याचा निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी याबाबत स्पष्टता दिली.
उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या वादावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करत अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सोमवारी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
२० ऑगस्टला पुढील सुनावणी
खंडपीठाने रोस्टरनुसार २० ऑगस्ट ही पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली असून, अंतिम सुनावणी दोन ते तीन दिवस चालण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या प्रकरणाची दखल घेण्यात आली.
“आता अंतिम निर्णय अपरिहार्य” – खंडपीठ
उद्धव गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून प्रकरणाचा तातडीने निकाल लावावा, अशी विनंती केली. याला शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी आक्षेप घेत, “दोन वर्षांपासून याचिकाकर्ते गप्प होते, आता अचानक अर्ज का दाखल केला?” असा सवाल केला. मात्र, न्यायालयाने हा आक्षेप फेटाळत, “आता दोन वर्षे झाली आहेत. या प्रकरणाचा आता सोक्षमोक्ष लावावाच लागेल,” असे स्पष्ट केले.
सिब्बल यांचा आक्षेप
सिब्बल यांनी सुनावणीदरम्यान सांगितले की, २०२३ मध्ये विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला, जो आधीच्या घटनापीठाच्या निकालाच्या विरोधात आहे. यावर न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, “अन्य प्रकरणांच्या सुनावणीवर परिणाम होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ.”