‘सेवेची प्रेरणा – विकासाचा संकल्प’: माजी सरपंच मिलिंद पाटील यांची पंचायत समिती निवडणुकीसाठी तयारी
आमदार अनिलदादा पाटील आणि जयश्रीताईंचा आदर्श

अमळगाव (प्रतिनिधी): माननीय आमदार अनिलदादा पाटील आणि माजी नगराध्यक्ष जयश्रीताई अनिल पाटील यांच्या कार्यशैलीतून आणि जनसंपर्कातून प्रेरणा घेत, अमळगाव गणातील जनतेची सेवा करण्याची तीव्र इच्छा व्यक्त करत माजी सरपंच मिलिंद गुलाबराव पाटील यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारीची तयारी दर्शविली आहे. ‘सेवेची प्रेरणा – विकासाचा संकल्प’ या ध्येयाने ते निवडणुकीला सामोरे जाण्यास उत्सुक आहेत.
माजी सरपंच मिलिंद पाटील यांनी यापूर्वी दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये पंचायत समिती सदस्यपदासाठी निवडणूक लढवून लोकांचा विश्वास संपादन केला होता. थोडक्यात विजय हुकला असला तरी जनतेचा स्नेह आणि आधार कायम राहिल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या धर्मपत्नी ममता मिलिंद पाटील यांनीही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी केली होती आणि त्याही कमी मतांच्या फरकाने पराभूत झाल्या होत्या, मात्र जनतेचा पाठिंबा कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘पराभव नव्हे, नव्या जोमाची सुरुवात’:
“पराभव नव्हे, नव्या जोमाची सुरुवात,” असे सांगत मिलिंद पाटील यांनी स्पष्ट केले की, लोकसेवेचा हा प्रवास आता अधिक जोमाने सुरू राहील. शिक्षण, शेती, महिला सक्षमीकरण, युवक मार्गदर्शन आणि पायाभूत सुविधा उभारणी या क्षेत्रांत अमळगाव गणाचा सर्वांगीण विकास साधण्याचा आपला ठाम निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.
दादा-ताईंच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारीसाठी सज्ज:
यावेळी बोलताना त्यांनी आमदार अनिलदादा पाटील आणि माजी नगराध्यक्ष जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. जर आमदार अनिलदादा पाटील आणि माजी नगराध्यक्ष जयश्रीताई पाटील यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी करण्यास तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. जनतेच्या आशीर्वादाने आणि दादा-ताईंच्या प्रेरणेने “सेवा, विकास आणि प्रामाणिकपणा” या तत्त्वांवर आधारित लोकसेवा करणे हेच आपले ध्येय असल्याचे मिलिंद पाटील यांनी यावेळी नमूद केले.






