विजेच्या धक्क्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । अमळनेर शहरात आज सकाळी विजेचा धक्का लागून विनायक नानू उदय (वय २०, रा.गजानन महाराज मंदिर जवळ,चोपडा रोड) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजा बाबू नागराज गोंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास गजानन महाराज मंदिराशेजारील ठाकूरदास चांदवानी (रा.मुंबई) यांच्या मालकीच्या इमारतीच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी घडली.
विनायक इमारतीच्या बांधकामावर लोखंडी सळई नारळाच्या दोरीने बांधून ओढत असताना, लिफ्टच्या विद्युत प्रवाहाचा त्याला धक्का बसला. विजेचा तीव्र धक्का लागल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. इमारतीत काम करणाऱ्या इतर मजुरांनी त्याला तात्काळ अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती विनायकला मृत घोषित केले.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करत आहेत.