

भुसावळात गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद; शहर पोलिसांची टेक्निकल हायस्कूलजवळ कारवाई
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या गुप्त माहितीवरून सापळा; पिस्टल अन् २ जिवंत कारतुसे हस्तगत
भुसावळ प्रतिनिधी
भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तांत्रिक हायस्कूलजवळ बेकायदेशीररीत्या अग्न्यास्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला शहर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. आरोपीकडून मॅगझिनसह एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत राउंड जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गणेश संतोष लोहार (वय २१, रा. महात्मा फुले नगर, भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड हे पथकासह गस्त घालत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांना बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली. संशयित इसम गण्या लोहार हा तांत्रिक हायस्कूल परिसरात गावठी बनावटीचा कट्टा बाळगून फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी सापळा रचला. पोलिसांना पाहून पळ काढण्याच्या तयारीत असलेल्या गणेश लोहारला घेराव घालून ताब्यात घेण्यात आले.
अंगझडतीत त्याच्याकडे ३० हजार रुपयांचे गावठी पिस्टल व २ हजारांचे जिवंत काडतुसे आढळले. पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त केला असून, हे शस्त्र त्याने कुणाकडून खरेदी केले व त्याचा काय घातपात करण्याचा विचार होता, याबाबत पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथक अधिक तपास करत आहे.







